अबु आझमी, विनायक ग्रुपवरील आयकरच्या छाप्यात घबाड मिळाले; 100 कोटींची बेनामी संपत्ती...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 06:33 PM2023-10-07T18:33:44+5:302023-10-07T18:33:57+5:30
मालदहिया येथील विनायक प्लाझा आणि आझमगढच्या काही निकटच्या लोकांची नावे आयकर विभागाच्या छाप्यात समोर आली आहेत.
दोन दिवसांपूर्वी सपाचे नेते आणि महाराष्ट्रातील आमदार अबु आझमी यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर आयकर विभागाने छापे मारले होते. ही कारवाई शनिवारी थांबविण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या कारवाईत आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागले आहे.
प्राप्तिकर विभागाच्या पथकाने बाबतपूर विमानतळाजवळील करोडोंची जमीन, अनेक बोगस फर्म, नातेवाइकांच्या नावे फ्लॅट्स आणि जमिनींची महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. आयकर विभागाच्या टीमला निकटच्या बिल्डरांसोबत व्यवहाराचे बँक स्टेटमेंट आणि जमिनींच्या खरेदी-विक्रीद्वारे सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची बेनामी संपत्ती सापडली आहे.
मालदहिया येथील विनायक प्लाझा आणि आझमगढच्या काही निकटच्या लोकांची नावे आयकर विभागाच्या छाप्यात समोर आली आहेत. या लोकांचा रिअल इस्टेट क्षेत्रात तगडी गुंतवणूक आहे. लखनौचे अतिरिक्त आयकर संचालक डीपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तपासासाठी पोहोचली होती. या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केले.
आझमगड येथील काही निकटवर्तीयांच्या नावावर, बाबतपूर विमानतळाजवळील मौल्यवान जमिनी, बोगस फर्म्स, विनायक प्लाझामधील दुकाने, शिवपूरच्या वरुणा गार्डनमधील फ्लॅट्स घेतले आहेत. अबू आझमींच्या छुप्या ठिकाणांवर पाच वर्षांत तिसऱ्यांदा छापे टाकण्यात आले आहेत, असे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याबाबतचे वृत्त अमर उजालाने दिले आहे. करचुकवेगिरीच्या संशयावरून लखनौ टीमने एकाच वेळी अबू आझमींच्या नोएडा, लखनौ आणि वाराणसी येथील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.