चुकून ‘नि’ चा ‘स’ झाला

By Admin | Published: January 19, 2017 05:39 AM2017-01-19T05:39:24+5:302017-01-19T06:22:08+5:30

गुजरात पोलिसांच्या कथित चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँच्या कुटुंबीयांना यापुढेही नि:शुल्क पोलीस संरक्षण मिळणार आहे.

Incorrectly, it became 'N' | चुकून ‘नि’ चा ‘स’ झाला

चुकून ‘नि’ चा ‘स’ झाला

googlenewsNext

राजू ओढे,

ठाणे- गुजरात पोलिसांच्या कथित चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँच्या कुटुंबीयांना यापुढेही नि:शुल्क पोलीस संरक्षण मिळणार आहे. पोलीस संरक्षणाचा खर्च भरण्याबाबतची नोटीस तिच्या कुटुंबीयांना पोलिसांनी बजावल्यानंतर वादंग निर्माण झाले होते. प्रत्यक्षात त्या नोटीसमध्ये ‘नि:शुल्क’ऐवजी चुकून ‘सशुल्क’ असा उल्लेख करण्यात आला होता, असे पोलिसांनी स्पष्ट केल्याने या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.
१५ जून २००४ रोजी गुजरातमध्ये झालेल्या एका चकमकीत चौघांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये १९ वर्षीय इशरत जहाँचाही समावेश होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उधळून लावण्यासाठी ही कारवाई केली असून चकमकीत ठार झालेले चारही जण लष्कर-ए-तय्यबाचे अतिरेकी असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तेव्हापासून मुंब्रा येथे वास्तव्यास असलेल्या इशरत जहाँच्या कुटुंबास २४ तास पोलीस संरक्षण देण्यात आले होते. वेगवेगळ्या कारणांसाठी अशा प्रकारे मोफत पोलीस संरक्षण पुरवण्यात आलेल्या सर्व प्रकरणांचा पोलीस खात्यामार्फत नियमित आढावा घेतला होता. त्यानुसार, ३० नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर इशरतची आई शमिमा कौसर हिला पोलिसांनी नोटीस बजावून पोलीस संरक्षणापोटी १ हजार ७२३ रुपये दररोज याप्रमाणे खर्च भरण्यास सांगितले होते. १ हजार ७२३ रुपये दररोज याप्रमाणे गत तीन महिन्यांचा खर्च जमा केला, तरच पोलीस संरक्षण यापुढेही पुरवले जाईल, असेही पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले होते.
मुंंब्रा येथे शमिमा कौसर यांच्यासोबत इशरतचा अविवाहित भाऊ आणि बहीण वास्तव्यास आहे. कुटुंबाचे उत्पन्न पुरेसे नसल्याने पोलीस संरक्षणापोटी दिवसाकाठी १ हजार ७२३ रुपयांचा खर्च आपणास झेपणारा नसल्याचे शमिमा कौसर यांनी स्पष्ट केले होते.
आपल्या कुटुंबास पोलीस संरक्षणाची गरज आहे, परंतु मासिक उत्पन्न जेमतेम १२ हजार रुपये असल्याने संरक्षणाचा खर्च आपण सोसू शकत नाही, असे त्यांनी पोलिसांना कळवले होते.
इशरत जहाँ चकमक प्रकरणाचा वाद अद्याप पूर्णत: मिटलेला नाही. मुंबई हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला अतिरेकी डेव्हिड हेडली याने इशरत ही ‘लष्कर’शी संबंधित असल्याचा जबाब नोंदवल्यानंतर हे प्रकरण नव्याने चर्चेत आले. अशातच पोलिसांनी इशरतच्या कुटुंबीयांना संरक्षणाचा खर्च भरण्याबाबत बजावलेल्या नोटीसमुळे वाद निर्माण झाला होता.
>..ही तर पोलिसांनी काढलेली पळवाट
‘नि:शुल्क’ऐवजी चुकून ‘सशुल्क’ असा उल्लेख करण्यात आला होता, असा दावा पोलिसांनी केला असला तरी दिवसाकाठी १ हजार ७२३ रुपये भरा हा उल्लेख त्यात कसा काय झाला. हा ‘ध’चा ‘मा’ होण्याचा प्रकार नाहीच, ही तर पोलिसांची पळवाट आहे, असे इशरतप्रेमींचे म्हणणे आहे.
इशरतच्या आईने तिची बाजू स्पष्टपणे मांडल्यानंतर नोटीस चुकून बजावण्यात आली होती, असे स्पष्ट केले आहे. शमिमा कौसर यांना बजावलेल्या नोटीसमध्ये ‘नि:शुल्क’ऐवजी चुकून ‘सशुल्क’ असा उल्लेख करण्यात आला होता, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. इशरतच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण यापुढेही मोफतच पुरवले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

Web Title: Incorrectly, it became 'N'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.