कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील अपघातात वाढ

By admin | Published: January 17, 2017 03:27 AM2017-01-17T03:27:58+5:302017-01-17T03:27:58+5:30

कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत.

Increase in accident on the Karjat-Kalyan State Road | कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील अपघातात वाढ

कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील अपघातात वाढ

Next

नेरळ : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे हे अपघात होत असून ही बाब बांधकाम विभागाच्या अनेकदा निदर्शनास आणून दिली आहे. मात्र तरीही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातील कर्जत -कल्याण राज्य मार्गावरील डिकसळजवळील एका हॉटेलजवळ गतिरोधक आणि आणि पुढे लगेच खड्डा असल्याने याठिकाणी वारंवार अपघात होतात. दोन महिन्यांत दोन चारचाकी आणि दोन दुचाकीला येथे अपघात घडला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
कर्जत तालुक्यात अनेक रस्त्यांची खड्ड्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सर्वच रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी प्रवासी व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. रस्ते भरण्याचे काम काही ठिकाणी करण्यात आले असले तरी तेही निकृष्ट दर्जाचे असल्याने आठवडाभरातच रस्ते ‘जैसे थे’ च होते. परंतु लाखो रु पये खर्च करून ठेकेदार खड्डे कशा प्रकारे भरतात याची पाहणी अधिकारीकरीत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने खड्डे भरण्याचे काम करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
कर्जत - कल्याण मार्गावरही अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पहायला मिळत आहेत. हे खड्डे आतापर्यंत चार वेळा भरण्यात आले आहे. मात्र अजूनही त्यांची दुरवस्थाच आहे. याच रस्त्यावर नेरळ जिते गावाजवळ पावसाळ्यात दरड कोसळून काही भाग रस्त्यावर आला होता. ही दरड अद्याप उचललेली नाही. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर डिकसळ येथील अपघात ठिकाणाची पाहणी करून त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. या संदर्भात बांधकाम विभागाचे उप अभियंता चंद्रशेखर सहनाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील डिकसळ येथील हॉटेलजवळ गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता चंद्रशेखर सहनाल यांच्याशी अनेक वेळा संपर्क करून अपघातासंदर्भात कळविले आहे. परंतु त्यांनी अद्यापही या जागेची पाहणी केली नाही. त्यांनी या अपघात ठिकाणी काहीही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने येथे अपघाताची मालिका सुरूच आहे.
- किशोर गायकवाड, स्थानिक ग्रामस्थ,डिकसळ

Web Title: Increase in accident on the Karjat-Kalyan State Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.