वेश्याव्यवसायातील पीडितांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या भत्त्यात वाढ
By admin | Published: November 18, 2016 06:03 AM2016-11-18T06:03:49+5:302016-11-18T06:03:49+5:30
तरुणींना त्यांच्या स्वत:च्या घरी पोहोचविण्यासाठी पोलिसांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
जमीर काझी / मुंबई :
वेश्याव्यवसायातून सुटका केलेल्या महिला, तरुणींना त्यांच्या स्वत:च्या घरी पोहोचविण्यासाठी पोलिसांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या प्रवासासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करून ही ड्युटी करणाऱ्या पोलिसांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त दैनंदिन भत्त्यात पूर्वीच्या तुलनेत तब्बल पाच वर्षांनी सरासरी दीडपट ते दुपटीने वाढ करण्यात आली आहे.
पीडित मुलगी, महिलेला त्याच जिल्ह्यातील घरी सोडावयाचे असल्यास ३०० रुपये तर जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी ४५० रुपये संबंधित बंदोबस्तावरील पोलिसाला दिले जाणार आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यासाठी आतापर्यंत अनुक्रमे १५० व ३०० रुपये दिले जात होते. ‘एस्कॉर्ट’च्या कामासाठी बहुतांशवेळा सशस्त्र दल (एल ए), मुख्यालयात नियुक्तीला असलेल्या पुरुष व महिला कॉन्स्टेबलची नेमणूक केली जाते. वाढत्या महागाईमुळे त्यांना घरी पोहोचविण्यासाठी लागणारी देण्यात येणारी रक्कम अपुरी पडत असे. तसेच संबंधित पोलिसाला स्वत:च्या पैशाची पदरमोड करावी लागत होती. त्यामुळे त्यांच्या मोबदल्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अडीच वर्षांपासून होत होती.
अखेर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला
होता. राज्य सरकारने त्याला नुकताच हिरवा कंदील दिला आहे. त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने त्याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. (प्रतिनिधी)