राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ
By admin | Published: March 18, 2016 04:05 AM2016-03-18T04:05:57+5:302016-03-18T04:05:57+5:30
महिलांचे सबलीकरण आणि त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारचा दावा काहीही असला तरी राज्यातील महिला आजही असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत राज्यात महिलांवरील
मुंबई : महिलांचे सबलीकरण आणि त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारचा दावा काहीही असला तरी राज्यातील महिला आजही असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांचे अपहरण करणे वा त्यांना पळवून नेण्याच्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ झाली आहे.
विधानसभेत आज सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात सामाजिक क्षेत्रावर प्रकाश टाकताना ही माहिती देण्यात आली आहे. २०१३ मध्ये महिलांवरील बलात्काराच्या ३०६३ घटना घडल्या होत्या. २०१४ मध्ये ही संख्या ३४३८ वर गेली. २०१५ अखेर हा आकडा ४१७६ वर गेला आहे. अपहरणाच्या घटना पहिल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८७४, २४५७ अशी होती. २०१५ मध्ये अपहरणाच्या ४८६४ घटना घडल्या.
महिलांच्या विनयभंगाच्या ११६९६ घटना गेल्या वर्षी घडल्या. २०१३ मध्ये ही संख्या ८१३२ तर त्यानंतरच्या वर्षी १०००१ इतकी होती. लैंगिक अत्याचाराच्या घटना मात्र कमी झाल्या. त्यांची संख्या तीन वर्षांत अनुक्रमे २६३२, १५७५ आणि ९८६ अशी होती. (विशेष प्रतिनिधी)
बालक अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ
- बालकांचे अपहरण वा त्यांना पळवून नेण्याच्या घटना २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये तिपटीने वाढल्या.
- २०१४ मध्ये २६१६ बालकांचे अपहरण झाले होते. २०१५ मध्ये ६५७६ बालकांचे अपहरण झाले.
- बालकांच्या खुनाचे प्रमाण मात्र घटले. २०१४ मध्ये २०७ तर नंतरच्या वर्षी १४३ खून झाले.