कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवा; दुसऱ्या लाटेची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:31 AM2020-11-18T05:31:19+5:302020-11-18T05:35:01+5:30
आराेग्य विभाग : दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रयोगशाळांना आदेश
स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे, सध्या रुग्ण बरे होण्याचा दरही ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र अनलाॅकच्या टप्प्यांनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना कोरोना चाचण्यांच्या क्षमतेत वाढ कऱण्याचे आदेश राज्याच्या आराेग्य विभागाने दिले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने या संदर्भात काढलेल्या विशेष परिपत्रकानुसार, राज्यातील ५०० वैद्यकीय प्रयोगशाळांना कोरोना चाचण्यांच्या क्षमतेत ८० टक्क्यांनी वाढ कऱण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात खासगी व सरकारी अशा दोन्ही प्रयोगशाळांचा समावेश आहे. राज्यात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना चाचण्यांचे ९० हजार हे प्रमाण कमी हाेऊन सप्टेंबर महिन्यात ते जवळपास ५७ हजार ३११ इतके झाले. ऑक्टाेबरमध्ये चाचण्यांचे प्रमाण एक लाखांमागे ६४ हजार इतके होते. परंतु १२ नोव्हेंबरपर्यंत यात घट होऊन ते ५५ ते ५६ हजारांवर आले.
खासगी आणि सरकारी वैद्यकीय प्रयोगशाळा सध्या क्षमतेपेक्षा केवळ ५० टक्के कोरोना चाचण्या करत आहेत. त्यामुळे या क्षमेतत वाढ करून आरटीपीसीआर वा प्रतिपिंड (अँटिजन) चाचण्यांत वाढ करण्याची सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेण्यावर भर
काेराेना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेण्यावर अधिकाधिक भर देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. लवकर निदान झाल्यास संसर्ग रोखण्यास मदत होईल आणि त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता धूसर होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने वर्तविला आहे.