पेंग्वीन दर्शन महागले प्रवेश शुल्कात वाढ
By admin | Published: April 1, 2017 09:47 PM2017-04-01T21:47:32+5:302017-04-01T21:47:32+5:30
पेंग्विनचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो पर्यटक राणी बागेच्या प्रवेशद्वारावर गर्दी करीत आहेत. मात्र या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी आता मुंबईकरांना पैसे मोजावे लागणार आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - पेंग्विनचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो पर्यटक राणी बागेच्या प्रवेशद्वारावर गर्दी करीत आहेत. मात्र या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी आता मुंबईकरांना पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी रखडलेला हा प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला आहे. राणीच्या बागेत प्रवेश करतानाच मुलासाठी २५ तर प्रौढांना शंभर रुपये आकारण्यात येणार आहेत.
भायकळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात आणलेल्या पेंग्वीनचे दर्शन १७ मार्चपासून मुंबईकरांना होऊ लागले आहे. पहिल्याच आठवड्यात पेंग्वीन पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली. एकाच दिवसात ४० हजार पर्यटक आल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला. त्यामुळे राणीच्या बागेत प्रवेशासाठी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत आज मांडण्यात आला.
सध्या राणीच्या बागेत मुलांसाठी दोन रुपये तर प्रौढांसाठी पाच रुपये आकारण्यात येतात. यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका निवडणुकीपूर्वी आणण्यात आला होता. मात्र याचे परिणाम निवडणुकीवर होतील, म्हणून शिवसेनेने यास विरोध करुन हा प्रस्ताव लांबणीवर टाकला होता. परंतु गटनेत्यांच्या बैठकीत आज दर निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक मुलासाठी २५ रुपये, प्रौढांसाठी प्रत्येकी शंभर रुपये तर दोन मुलं व आई-वडील एकत्र आल्यास चौघांचे मिळून शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत. प्रतिनिधी
असा होता मूळ प्रस्ताव
पेंग्विन दर्शनासाठी १२ वर्षांखालील मुलांना ५० रुपये तर प्रौढांना शंभर रुपये आकारण्याचे प्रस्तावित आहे. १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार होते. गटनेत्यांच्या बैठकीत यामध्ये आज बदल करीत मुलांसाठी २५, प्रौढांसाठी प्रत्येकी शंभर तर आई-वडील व दोन मुलं आल्यास शंभर असे दर आकारण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी सांगितले.
दोन आठवड्यात दोन लाख पर्यटक
बर्फाच्या गोळ्यासारखे पण तितकेच लोभस रुप असलेले हे पेंग्विन राणीच्या बागेतील एका छोट्याशा जागेत गेले आठ महिने राहत होते़. मार्चच्या दुस-या आठवड्यात राणी बागेतील प्रशस्त काचघरात त्यांना हलवण्यात आले. १८ मार्चपासून दोन लाख पर्यटक पेंग्वीन पाहण्यासाठी येऊन गेले आहेत. स. ९.३० ते संध्या. ५ पर्यंत व रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी ४ वाजेपर्यंत पेंग्वीन पाहता येईल.
* एक ते दोन वर्षे वय असलेल्या या पेंग्विनचे वजन सुमारे एक ते अडीच किलो एवढे आहे़
* सद्यस्थितीत १२ ते १५ सेंमी उंची असलेल्या या पक्ष्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची उंची सुमारे ६५ ते ७० सेंमी इतकी होईल.
* त्यावेळीस त्यांचे वजन चार ते सहा किलो इतके असू शकेल़ त्यांचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असते
* स्थायी समिती आणि महापालिकेच्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच ही दरवाढ होणार आहे.