राज्यात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2016 03:58 AM2016-09-15T03:58:29+5:302016-09-15T03:58:29+5:30
पावसाळा सुरू झाल्यावर पसरणाऱ्या साथींच्या आजारांत यंदा राज्यातील शहरे अग्रक्रमावर दिसून येत आहेत. पुणे, नाशिक, ठाणे या शहरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत
मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर पसरणाऱ्या साथींच्या आजारांत यंदा राज्यातील शहरे अग्रक्रमावर दिसून येत आहेत. पुणे, नाशिक, ठाणे या शहरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पण त्याचबरोबर मलेरियाच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
गेल्यावर्षी डेंग्यूचे १ हजार ६०० रुग्ण आढळून आले होते. तर, यंदा जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत (१४ सप्टेंबर) या कालावधित डेंग्यूचे २ हजार ५७२ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूमुळे राज्यात गेल्यावर्षी १० जणांचा तर यंदा दोघांचा मृत्यू झाला आहे. पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर या परिसरात डेंग्यूचे अधिक रुग्ण असून नवी मुंबई व मुंबईत या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे आरोग्य विभाग सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत राज्यात मलेरियाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत होती. पण, यंदा या रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षभरात मलेरियाचे ३० हजार रुग्ण आढळून आले होते. तर, यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १५ हजार रुग्ण आढळले आहेत. चिकनगुनियाचे ४५० रुग्ण असल्याची आकडेवारी आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. (प्रतिनिधी)
मुंबई : उसंत घेतलेला पाऊस मुंबईत पुन्हा सुरू झाला असून सप्टेंबरमध्ये डेंग्युमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतला हा डेंग्यूचा दुसरा मृत्यू आहे. सप्टेंबरमध्ये साथीच्या रुग्णांत थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. या महिन्यात तापाचे ४ हजार ६०७ रुग्ण आढळले असून डेंग्यूचे १२२ रुग्ण आढळले आहेत.
विक्रोळीच्या चैतन्य नगरमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा ८ सप्टेंबरला डेंग्यूमुळे मृत्यू झाला. ही महिला मूळची मालवणची आहे. ती रुग्णालयात दाखल होण्याआधी १० दिवस मुंबईत मुलाकडे राहायला आली होती. ३० आॅगस्टला ताप, डोकेदुखीचा त्रास तिला जाणवू लागला. त्यामुळे तिला पवईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला डोंबिवलीच्या रुग्णालयात हलवण्यात आले. औषधोपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे ३ सप्टेंबरला तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जानेवारीत डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू झाला होता.
११ सप्टेंबरपर्यंत मलेरियाचे ३१५, लेप्टोचे ९, गॅस्ट्रोचे २४९, हॅपिटायटिसचे ६३ आणि कॉलराचा १ रुग्ण आढळला असल्याची आकडेवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
ठाणे-डोंबिवलीत डेंग्यूचे तीन बळी
ठाणे : सतत बदलत्या हवामानामुळे ठाणे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दिवसेंदिवस ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत डेंग्यूने शहरात तिघांचा मृत्यू झाला असून लेप्टोनेदेखील एक महिला दगावल्याची माहिती समोर आली आहे. शहरात आतापर्यंत सुमारे २४५ च्या आसपास लोकांना डेंग्यूची लागण झाली असून महापालिकेच्या कळवा रुग्णालयाबरोबरच आरोग्य केंद्रेदेखील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे फुल्ल झाली आहेत.
मलेरिया, ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. शहरात आतापर्यंत सुमारे २४५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून त्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, ८२४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळल्याचेही सांगितले. तर, मुंब्य्रात डेंग्यूचा विळखा वाढला असून घोडबंदरसारख्या सोसायट्यांच्या भागातही डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती पालिकेच्या सर्व्हेतून पुढे आली आहे. तर, लेप्टोनेदेखील एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कळवा रुग्णालयातदेखील ओपीडीवर येणाऱ्या रुग्णांचा आकडा ५०० वरून एक हजाराच्या आसपास गेला आहे. पालिकेच्या २५ आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.