वाढीव ईबीसी सवलत यंदापासूनच
By admin | Published: October 27, 2016 01:01 AM2016-10-27T01:01:16+5:302016-10-27T01:01:56+5:30
अंमलबजावणी सुरू : आॅनलाईन अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारणार
चंद्रकांत कित्तुरे --कोल्हापूर --आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईबीसी) वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये असणाऱ्या, तसेच सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या, परंतु ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, तसेच पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनांचा लाभ २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून मिळणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
ईबीसीची मर्यादा वाढविण्याची घोषणा राज्यकर्त्यांकडून तीन वर्षांपासून केली जात होती; पण निर्णय होत नव्हता. राज्यात ईबीसीची मर्यादा वाढविण्यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाल्यानंतर सरकारवरील दबाव वाढला. त्यामुळे सरकारने १३ आॅक्टोबरला ईबीसी मर्यादा एक लाखावरून अडीच लाख करण्याची आणि सहा लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनांची घोषणा केली. परंतु ही योजना यंदापासून लागू होणार की पुढील शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार याबाबत संभ्रम होता. मात्र, सरकारने त्यासंदर्भातील अध्यादेश तातडीने जारी केल्याने या योजनेचा लाभ यंदापासूनच मिळणार हे निश्चित झाले. शालेय तसेच उच्च व तंत्रशिक्षण खात्यानेही संबंधित शाळा, महाविद्यालयांना परिपत्रक पाठवून या योजनांच्या परिपूर्तीसाठीचे वेळापत्रक कळविले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही आॅनलाईन अर्ज भरणे सुरू केले आहे.
सीमाभागातील विद्यार्थ्यांनाही लागू
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबरोबरच कर्नाटकातील सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांनाही या योजना लागू असल्याने त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
यासाठी त्यांना सीमाभागातील रहिवासाचे कर्नाटकचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही लाभ
शाळा, महाविद्यालयांबरोबरच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणारे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अॅँड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर आॅफ बिझनेस मॅनेजमेंट, मॉस्टर आॅफ मॅनेजमेंट स्टडीज, मास्टर आॅफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन या अभ्यासक्रमांनाही या योजनांचा लाभ मिळणार आहे.
आॅनलाईन अर्ज भरावा लागणार
ईबीसी सवलतीसाठीचे अर्ज दहावी, बारावी, पदवी, मागील वर्षीच्या उत्तीर्णतेची गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, प्रवेश फी, बॅँक खाते पावती, आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. २१ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर ही आहे.
शिष्यवृत्तीसंदर्भात कार्यशाळा
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ८९ महाविद्यालयांच्या प्रतिनिधीसाठी कोल्हापुरातील शिक्षण सहसंचालक कार्यालयाने तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाही घेतली आहे. असे प्रशिक्षण राज्यात प्रथमच कोल्हापुरात देण्यात आले आहे.
उच्च व तंत्र शिक्षण महाविद्यालयांना ईबीसी सवलतीच्या मर्यादा वाढीचे परिपत्रक पाठविण्यात आले असून, आॅनलाईन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- डॉ. अजय साळी, सहसंचालक,
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, कोल्हापूर