वीजग्राहकांना दरवाढीचा झटका
By admin | Published: November 17, 2015 02:17 AM2015-11-17T02:17:29+5:302015-11-17T02:17:29+5:30
आॅक्टोबरच्या वीज देयकांमध्ये महावितरणने इंधन समायोजनाच्या नावाखाली सरासरी ७३.२४ पैसे प्रतियुनिट आकारणी केली आहे. परिणामी, राज्यातील सव्वादोन कोटी वीज ग्राहकांना दरमहा
मुंबई : आॅक्टोबरच्या वीज देयकांमध्ये महावितरणने इंधन समायोजनाच्या नावाखाली सरासरी ७३.२४ पैसे प्रतियुनिट आकारणी केली आहे. परिणामी, राज्यातील सव्वादोन कोटी वीज ग्राहकांना दरमहा ५९१ कोटी रुपये म्हणजे १२.७५ टक्के दरवाढीचा जबरदस्त शॉक बसला आहे. ही आकारणी ३ महिने करण्यात येणार आहे, असे परिपत्रक महावितरणने काढले आहे. म्हणजे आयोगाच्या आदेशाद्वारे प्रत्यक्ष ८.५ टक्के आणि इंधन समायोजन आकाराचे हत्यार उपसून अप्रत्यक्षपणे १२.७५ टक्के असा एकूण २१.२५ टक्के दरवाढीचा बोजा राज्यातील सर्व ग्राहकांवर किमान ३ महिने लादण्यात आला आहे.
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी यासंबंधीची माहिती दिली असून, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे आदेश मोडून केलेल्या वीजखरेदीमुळे ही सर्व आकारणी बसली असून, ती बेकायदेशीर आहे. या आकारणीविरोधात १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत संघटनेच्या वतीने दाद मागण्यात येणार आहे. वाढीव खर्चाची आकारणी रद्द करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२६ जून २०१५ रोजी आयोगाने नवीन वीजदर निश्चित केले होते. जेव्हा नवे वीज दर निश्चित केले जातात; तेव्हा तत्कालीन बाजारभावानुसार वीज खरेदीचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे जुलै २०१५मध्ये इंधन समायोजन आकार शून्य असावयास हवा होता. शिवाय टप्प्याटप्प्याने तो गरजेनुसार वाढणेही अपेक्षित होते. मात्र जुलै २०१५मध्ये खरेदी झालेल्या विजेपोटी जादा खर्चाची आकारणी आॅक्टोबर महिन्याच्या देयकात करण्यात आली.