सिंचन प्रकल्पांसाठी निधी वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:30 AM2019-01-17T06:30:04+5:302019-01-17T06:30:07+5:30
गडकरींची मुख्यमंत्र्यांना सूचना : औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद
औरंगाबाद : राज्यातील सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधी वाढवावा, अशी सूचना केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना केली. औरंगाबादेत बुधवारी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालयातर्फे नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे आयोजन औरंगाबादेतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. सध्या महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये दुष्काळ आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी निधी प्राधान्याने उपलब्ध केला. यात महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या १०८ प्रकल्पांचा समावेश आहे. येत्या दोन-तीन वर्षांत हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास सिंचनाचे प्रमाण वाढणार आहे. तरीही मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदामंत्री महाजन यांनी लक्ष देऊन सिंचनाचा निधी वाढविला पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले. कर्नाटक, तेलंगणा ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा लहान आहेत, तरीही ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा अधिकचा निधी सिंचनावर खर्च करीत आहेत. राज्याचा सिंचन निधी वाढविण्यासाठी
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटन सत्रात फिजीचे कृषिमंत्री डॉ. महेंद्र रेड्डी, आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाचे अध्यक्ष इंजि. फेलिक्स रेंडर्स यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक केंद्रीय सचिव यू. पी. सिंग यांनी केले.
या मान्यवरांची उपस्थिती
फिजीचे कृषिमंत्री डॉ. महेंद्र रेड्डी, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कर्नाटकचे जलसंपदामंत्री डी.के. शिवकुमार, कृषिमंत्री के. शिवशंकर रेड्डी, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सत्यप्रताप सिंग, गोव्याचे जलसंपदामंत्री विनोदा पालिन्सर, दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन, केंद्रीय जलसंसाधन सचिव यू.पी. सिंग, केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष मसूद हुसेन, आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाचे अध्यक्ष इंजि. फेलिक्स रेंडर्स, महासचिव ए.बी. पंड्या आदी उपस्थित होते.