वांद्रे-वरळी सी लिंकवरील कठड्याची उंची वाढवणार
By admin | Published: December 18, 2014 05:25 AM2014-12-18T05:25:42+5:302014-12-18T05:25:42+5:30
वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता या सी लिंकच्या कठड्याची उंची पाच फूट
नागपूर : वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता या सी लिंकच्या कठड्याची उंची पाच फूट वाढविण्यात येणार असून त्यावर जाळी बसवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.
प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. सी लिंकवरून आतापर्यंत नऊ लोकांनी उडी मारून आत्महत्या केल्याने सरकार कोणत्या उपाययोजना करणार, असा प्रश्न त्यांनी विचारला.
त्यावर, जानेवारी ते सप्टेंबर २०१४ मध्ये सी लिंकवरून दोन व्यक्तींनी उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्या रोखण्याकरिता परिमंडळ-तीनच्या उपायुक्तांनी राज्य रस्ते
विकास महामंडळाला पत्र लिहून सी लिंकच्या दोन्ही मार्गिकेवर दिवसा व रात्री नजरेस पडतील, असे नो पार्किंगचे फलक लावणे, दोन्ही
मार्गिकेवर सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षा रक्षक नेमणे अशा उपाययोजना सुचवल्या असल्याचे फडणवीस म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)