आपत्तीग्रस्तांच्या मदतीत वाढ, केंद्र सरकारचे निकष राज्य सरकारने स्वीकारले, मंत्रिमंडळाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 10:47 AM2023-02-27T10:47:37+5:302023-02-27T10:47:45+5:30
निर्णय रविवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ)साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आपत्तीग्रस्तांच्या मदतीत भरघोस वाढ झाली आहे. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी १ नोव्हेंबर, २०२२ पासून होणार आहे.
सुधारित दर पुढीलप्रमाणे
(कंसात जुने दर) : मृतांच्या कुटुंबीयांना - ४ लाख रुपये (बदल नाही). चाळीस ते ६० टक्के अपंगत्व आल्यास-७४ हजार रुपये (५९ हजार १००). साठ टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास-२.५० लाख रुपये (२ लाख).
जखमी व्यक्ती इस्पितळात एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी-१६ हजार रुपये (१२ हजार ७००), एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी-५ हजार ४०० (४ हजार ३००).
दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र / घर पाण्यात बुडालेले असल्यास / घरे पूर्णत: वाहून गेली असल्यास / पूर्णत: क्षतिग्रस्त झाल्यास प्रति कुटुंब-२ हजार ५०० (बदल नाही). सामानाच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब-२ हजार ५०० (बदल नाही).
पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या / कच्च्या घरांसाठी सखल भागात-१ लाख २० हजार रुपये (९५ हजार १००). दुर्गम भागातील घरांसाठी-१ लाख ३० हजार (१ लाख १ हजार ९००). अंशत: पडझड पक्क्या घरांसाठी-६ हजार ५०० (५ हजार २००). अंशत: पडझड कच्च्या घरांसाठी-४ हजार रुपये (३ हजार २००). झोपडीसाठी-८ हजार रुपये (४ हजार १००).
मृत दुधाळ जनावरांसाठी - ३७ हजार ५०० (३० हजार), वासरू, गाढव, खेचर आदीसाठी-२० हजार रुपये (१६ हजार रुपये). मेंढी, बकरी, डुक्कर यासाठी-४ हजार रुपये (३ हजार). कुक्कुटपालन - १०० रुपये प्रति कोंबडी, दहा हजार रुपयांपर्यंत (५० रुपये प्रति कोंबडी, ५ हजार रुपयांपर्यंत).
शेती जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी - ८ हजार ५०० रुपये, २ हेक्टर मर्यादेत (६ हजार ८००). आश्वासित सिंचनाखालील पिकांसाठी-१७ हजार रुपये प्रति हेक्टरी (१३ हजार ५००).
शेतजमिनीच्या नुकसानीसाठी - १८ हजार रुपये प्रति हेक्टरी (१२ हजार २०० रुपये). दरड कोसळून किंवा जमीन खरडून झालेल्या नुकसानीसाठी - ४७ हजार रुपये, प्रति हेक्टरी. (३७ हजार ५००)
मत्स्य व्यवसाय - बोटींच्या अंशतः दुरुस्तीसाठी-६ हजार रुपये (४ हजार १००). अंशतः बाधित जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी-३ हजार रुपये (२ हजार १००). पूर्णतः नष्ट बोटीकरिता-१५ हजार रुपये (९ हजार ६००). पूर्णतः नष्ट जाळ्यांसाठी-४ हजार रुपये (२ हजार६०० रुपये).