पिवळे व केशरी कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा - नवाब मलिक
By अतुल कुलकर्णी | Published: August 24, 2017 04:37 PM2017-08-24T16:37:54+5:302017-08-24T16:39:58+5:30
ओबीसींची क्रिमीलेयरची मर्यादा वाढविल्यानंतर आता राष्टÑवादीने नवीन मागणी पुढे केली आहे.
मुंबई - केंद्र सरकारने ज्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गासाठी क्रिमिलेअर मर्यादा सहा लाखावरुन आठ लाख केली. याप्रमाणेच एपीएलसाठी (केशरी कार्डधारक) असलेली एक लाखाची मर्यादा दोन लाख करावी तसेच प्राधान्य गटासाठी (पिवळे कार्डधारक) ग्रामीण भागात ४४ हजार तसेच शहरी भागात ५९ हजारांची उत्पन्न मर्यादा वाढवून एक लाख करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
ओबीसी प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचे स्वागत करत आहे. सध्या महागाईने सर्वच ठिकाणी टोक गाठलेले आहे. आरोग्य, स्वयंरोजगार अशा विविध शासकीय योजनांसाठी पिवळे व केशरी रेशनकार्डसाठी असलेली उत्पन्न मर्यादा हाच निकष लावला जातो. ही उत्पन्न मर्यादा कमी असल्यामुळे निम्न मध्यम वर्गातील नागरिक या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. महागाई वाढली असताना आज प्राधान्य गटासाठी (पिवळे कार्डाधारक) शहरी आणि ग्रामीण अशी उत्पन्नाची विभागणी न करता दोन्ही ठिकाणी सरसकट एकच निकष लावून ही मर्यादा वाढवावी. केंद्राने ज्याप्रमाणे ओबीसींची क्रिमिलेअर मर्यादा वाढवली त्याप्रमाणेच रेशन कार्ड धारकांची उत्पन्न मर्यादा वाढवावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.