कल्याण-कसारा-कर्जत लोकल फेऱ्या वाढवा, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची नरेंद्र पवार यांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 06:34 PM2021-09-07T18:34:51+5:302021-09-07T18:35:23+5:30
कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवाश्यांच्या समस्यांबाबत चर्चा झाली.
डोंबिवली: कल्याण ते कसारा कर्जतच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी, कल्याण-कर्जत-कसारा रेल्वे प्रवासी समस्या, रेल्वे कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना, जळगाव जिल्ह्यातील रेल्वे समस्या, सीएसटी ते पंढरपूर- सांगोला एक्सप्रेस सुरू करावी यामागण्यांसाठी मंगळवारी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत चर्चा केली.
कल्याण कसारा कर्जत तिसरी व चौथ्या मार्गिकेचे काम तातडीने पूर्ण करणे, कल्याण यार्ड रिमोडलिंग प्रकल्प मार्गी लावावा, आसनगाव महत्वाचे स्थानक असल्याने होम प्लॅटफॉर्म सेवा उपलब्ध करावी, जीआरपी चौकी प्रत्येक स्थानकात असावी यामागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. २००४ पूर्वी नियुक्त झालेल्या मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना सुरू करण्यात यावी, ठाणे जिल्ह्यातील हजारो खान्देशातील प्रवाश्याच्या मागणीवरून मुंबई-भुसावळ एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, सीएसटी ते पंढरपूर-सांगोला एक्सप्रेस सुरू करण्याबाबत पवार यांनी चर्चा केली.
त्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दानवे यांनी दिले. या चर्चेत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज सभागृहात झालेल्या चर्चेत पवार यांच्यासमवेत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई, कुंदा चंदणे, अरुणा गोखले आदी उपस्थित होते.