विवाहित पुरुषांच्या आत्महत्येत वाढ
By admin | Published: May 18, 2017 02:35 AM2017-05-18T02:35:40+5:302017-05-18T02:35:40+5:30
पतीच्या जाचाला पत्नी बळी पडत असल्याच्या घटना वरचेवर ऐकायला मिळतात. परंतु आता पत्नीचा जाच पतीला सहन करत लागत असल्याचा दावा पुरुष हक्क संघटनेकडून
- स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पतीच्या जाचाला पत्नी बळी पडत असल्याच्या घटना वरचेवर ऐकायला मिळतात. परंतु आता पत्नीचा जाच पतीला सहन करत लागत असल्याचा दावा पुरुष हक्क संघटनेकडून होत आहे. देशभरात २१ वर्षांत तब्बल १० लाख ३३ हजार ९७६ विवाहित पुरुषांनी पत्नीकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून जीवन संपविले आहे.
पुण्यात मराठी चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार, २०१५ मध्ये देशभरात तब्बल ६४ हजार ५३४ विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर २०१३, २०१४ साली अनुक्रमे ६४ हजार ०९८ आणि ५९ हजार ७४४ विवाहित पुरुषांनी आयुष्य संपविले.
पत्नीच्या जाचामुळे पतीने आत्महत्या करण्याच्या घटना वाढत आहेत.२१ वर्षातील ही आकडेवारी पाहता त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वर्ष आत्महत्या
१९९५ ३५,२४५
२000 ४६,000
२00५ ५२,४८३
२0१0 ६१,४५३
२0११ ६२,४00
२0१२ ६३,३४३
२0१३ ६४,0९८
२0१४ ५९,७४४
२0१५ ६४,५३४
निराशेवर समुपदेशातून मात करणे शक्य
मुली जशा आईवडिलांचे घर सोडून येतात तसेच मुलानेही लग्नानंतर आईवडिलांचे घर सोडून स्वतंत्र संसार थाटावा, अशी आजकाल अनेक मुलींची अपेक्षा असते. पतीकडून त्यांच्या कौटुंबिक, आर्थिक पातळीवर अनेक अपेक्षा असतात. अपेक्षापूर्ती न झाल्यास वाद होतात. अनेक निराश पती समुपदेशनाससाठी येतात. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना आलेले नैराश्य, कौटुंबिक कलह, पत्नीच्या एकाधिकारशाहीमुळे आलेला तणाव याची जाणीव होते. समुपदेशनामुळे त्यावर मात करणे शक्य होते.
- डॉ. राजेंद्र बर्वे, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ