दूधखरेदी दरात वाढ
By admin | Published: June 20, 2017 02:46 AM2017-06-20T02:46:15+5:302017-06-20T02:46:15+5:30
सरकारने दूध खरेदी दरातप्रति लीटर तीन रुपयांची वाढ करून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सरकारने दूध खरेदी दरातप्रति लीटर तीन रुपयांची वाढ करून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दूधविक्री दरात वाढ न केल्याने ग्राहकांवर या दरवाढीचा बोजा पडणार नाही.
गाईच्या दुधाचा खरेदी दर २४ रुपयांवरून २७ रु पये तर, म्हशीच्या दुधाचा खरेदी दर ३३ रु पयांवरु न ३६ रुपये एवढे करण्यात आली असून हे वाढीव दर २१ जूनपासून लागू होतील. शेतकरी आंदोलनात कर्जमाफीबरोबरच दूध दरवाढीची मागणी पुढे आली होती. सरकारने त्याबाबत सुकाणू समितीला आश्वस्त केले होती. दूध खरेदी दराबाबत दुग्धविकास व मत्स्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रदत्त समितीने प्रति लिटर तीन रुपये दरवाढ सूचित केली असून सरकारने ती मान्य केली आहे.
मात्र, हे वाढीव दर सरकारी आणि सहकारी दूध संस्थांना लागू आहेत. खासगी दूध संघानी अजून वाढ केलेली नाही. पण दूध संकलन टिकवून ठेवण्यासाठी दरवाढ करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही. खासगी संघांनी खरेदीदरात वाढ केलीच तर विक्रीदरात वाढ करून ते ग्राहकांकडूनच वसूल करतील.