कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात ११ मार्चपासून नवे निर्बंध लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 09:55 PM2021-03-10T21:55:24+5:302021-03-10T21:58:26+5:30
Coronavirs Restrictions : पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून आता पुन्हा एकदा प्रशासनानं कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय धेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानं आता सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंतच खुली ठेवण्यास मुभा असेल. दरम्यान, हे निर्बंध पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहेत.
कल्याण डोंबिवली परिसरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ३९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच सध्या २३६ कोरोनाबाधितांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीव कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पालिका क्षेत्रात पुन्हा नवे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीतील काही महत्वाचे निर्णय
- दुकानं सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत सुरू राहतील. यातून अत्यावश्यक सेवा, भाजीपाला, फळे, किराणा, दुध आणि वृत्तपत्र सेवांना वगळण्यात आलं आहे.
- प्रत्येक शनिवार आणि रविवार या दिवशी दुकानं P1 आणि P2 नुसार सुरू राहतील.
- हातगाड्या, फेरीवाली यांना सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेतच परवानगी असेल.
- शहरातील सर्व आठवडे बाजार बंद राहतील.
- भाजी मंडया ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील.
- सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, उत्सव समारंभ यांना परवानगी देण्यात येणार नाही.
- लग्न व इतर समारंभांमध्ये नियमांचं पालन करावं लागणार आहे. तसंच पोलीस स्थानकात प्रतिज्ञापत्रही सादर करावं लागणार आहे.
- बार आणि रेस्टॉरंट सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार, होम डिलिव्हरीसाठी १० वाजेपर्यंत परवानगी असेल.