Municipal Corporations : मनपा व नगर परिषदेत नगरसेवक संख्येत वाढ, मुंबईत मात्र कायम; राज्य सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 07:17 AM2021-10-28T07:17:48+5:302021-10-28T07:18:10+5:30
Municipal Corporations : महापालिकांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक व सहा लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या नगरसेवकांची किमान संख्या ७६ व जास्तीत जास्त ९६ पेक्षा अधिक नसेल.
मुंबई : राज्यातील २६ महापालिका आणि सर्व नगर परिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई महापालिकेत मात्र सध्याची २२७ ही नगरसेवक संख्या कायम असेल.
राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन नगरसेवक संख्येत वाढ करण्यात आली आहे. सध्या महापालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ आहे. तर नगर परिषदांमधील सदस्य संख्या किमान १७ सदस्य व कमाल ६५ इतकी आहे.
किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्यादेखील वाढेल. २०२१ची जनगणना कोरोनामुळे होऊ शकलेली नाही. त्यामुळे लोकसंख्येतील अपेक्षित वाढ गृहीत धरून नगरसेवक संख्या वाढविण्याची भूमिका मंत्रिमंडळाने घेतली. बहुतेक महापालिकांमधील नगरसेवक संख्या ११ने वाढली. सरासरी १७ टक्के वाढ करण्यात आली असली तरी ही वाढ सरसकट नाही. विशेषत: नागपुरात केवळ पाचच नगरसेवक वाढले.
महापालिकांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक व सहा लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या नगरसेवकांची किमान संख्या ७६ व जास्तीत जास्त ९६ पेक्षा अधिक नसेल. सहा लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंतच्या लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ९६ व कमाल संख्या १२६ पेक्षा अधिक नसेल.
१२ लाखांपेक्षा अधिक व १४ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १२६ व कमाल संख्या १५६ पेक्षा अधिक नसेल. २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १५६ व कमाल संख्या १६८ पेक्षा अधिक नसेल. ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या
पालिका सदस्यांची किमान संख्या १६८ व कमाल संख्या १८५ पेक्षा अधिक नसेल. नगर पंचायतींमधील सध्याची नगरसेवक संख्या कायम राहील.
नगर परिषदांमध्ये राहील असे चित्र
अ वर्ग नगर परिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या ४० व कमाल संख्या ७५ हून अधिक नसेल. ब वर्ग नगर परिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २५ व कमाल संख्या ३७ हून अधिक नसेल. क वर्ग नगर परिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २० व अधिक संख्या २५ हून अधिक नसेल.
महापालिका नगरसेवक सुधारीत
संख्या संख्या
पुणे १६२ १७३
नागपूर १५१ १५६
औरंगाबाद ११५ १२६
ठाणे १३१ १४२
पिंपरी-चिंचवड १२८ १३९
नाशिक १२२ १३३
कल्याण-डोंबिवली १२२ १३३
नवी मुंबई १११ १२२
वसई-विरार ११५ १२६
अमरावती ८७ ९८
परभणी ६५ ७६
चंद्रपूर ६६ ७७
अहमदनगर ६८ ७९
लातूर ७० ८१
धुळे ७४ ८५
जळगाव ७५ ८६
उल्हासनगर ७८ ८९
पनवेल ७८ ८९
अकोला ८० ९१
कोल्हापूर ८१ ९२
नांदेड-वाघाळा ८१ ९२
मालेगाव ८४ ९५
भिवंडी-निजामपूर ९० १०१
मिरा-भाईंदर ९५ १०६
सोलापूर १०२ ११३
सांगली-मिरज ७८ ८९