मुंबईत हस्ताक्षरतज्ज्ञांची संख्या वाढवा
By admin | Published: February 3, 2017 01:00 AM2017-02-03T01:00:20+5:302017-02-03T01:00:20+5:30
खटल्यांच्या तुलनेत हस्ताक्षर तज्ज्ञ अत्यल्प असल्याने अनेक खटले रखडले आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने हस्ताक्षरतज्ज्ञांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारने
मुंबई : खटल्यांच्या तुलनेत हस्ताक्षर तज्ज्ञ अत्यल्प असल्याने अनेक खटले रखडले आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने हस्ताक्षरतज्ज्ञांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारने काहीतरी करावे, अशी सूचना राज्य सरकारला केली.
पतीने बनावट सही केल्याचा आरोप करून पोलीस ठाण्यात नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी एका महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. घटस्फोटाच्या अर्जावर बनावट सही करून काझीपुढे सादर केल्याचा आरोप पतीने पत्नीवर केला आहे. मात्र या आरोपात तथ्य नसल्याचे पत्नीने खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने यासंदर्भात हस्ताक्षर तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? अशी विचारणा सरकारी वकिलांकडे केली. मात्र हस्ताक्षरतज्ज्ञांची कमतरता असल्याचे खंडपीठाला सांगण्यात आले. न्यायालयाने महाधिवक्ता रोहित देव यांचे लक्ष या बाबीकडे वेधून घेतले. प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये ६०२ पदे भरण्यात येणार असल्याची माहिती देव यांनी दिली. खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)
खटल्यांना विलंब
तज्ज्ञांच्या कमतरतेमुळे खटले प्रलंबित राहतात. दरवेळी एकच उत्तर देण्यात येते की, तज्ज्ञांकडे कामाचा अधिक भार आहे. परिणामी न्यायदान प्रक्रियेलाही विलंब होत आहे, असे खंडपीठाने म्हटले.