कामगार रुग्णालयांची संख्या वाढवू

By admin | Published: May 29, 2017 03:15 AM2017-05-29T03:15:24+5:302017-05-29T03:15:24+5:30

कामगार रुग्णालयात कॅन्सर, किडनी, हृदयरोग असे स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहेत. ईएसआयसीचा इन्श्युरन्स घेतलेला

Increase the number of labor hospitals | कामगार रुग्णालयांची संख्या वाढवू

कामगार रुग्णालयांची संख्या वाढवू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कामगार रुग्णालयात कॅन्सर, किडनी, हृदयरोग असे स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहेत. ईएसआयसीचा इन्श्युरन्स घेतलेला प्रत्येक व्यक्ती हा आमच्यासाठी अतिमहत्त्वाचा आहे. पुण्यात ३ लाख लाभधारक असून, त्यांना २४ तास वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. राज्यातील कामगार रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एक हजार कोटीची तरतूद केली जाणार असल्याचे आश्वासन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिले.
बिबवेवाडी येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयाचे (ईएसआयसी) नूतनीकरण आणि श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. सध्या असलेले ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांचे करण्यात येणार असून उद्घाटन बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, नगरसेविका अनुसया चव्हाण, मानसी देशपांडे, केंद्रीय कामगार सचिव एम. सत्यवती आदी उपस्थित होते.
दत्तात्रय म्हणाले, ‘‘नवीन रुग्णालयांसाठी महाराष्ट्रातून दहा प्रस्ताव आले आहेत. नवीन ईएसआयसी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी राज्यातून दहा प्रस्ताव आले आहेत.
त्यापैकी पुणे जिल्ह्यातून रांजणगाव व हिंजवडीसाठी येथून प्रत्येकी १०० बेड, चाकणसाठी १५० बेड तर बारामतीसाठी ३० बेड रुग्णालयांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्याचबरोबर शिरवळ, सातारा येथून प्रत्येकी ३० बेड, पनवेल, खारघर, बेलापूर येथून प्रत्येकी १०० बेड तर वाशीमधून १५० बेडची नवीन रुग्णालये उभी करण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे प्रस्ताव आले आहेत. ही रुग्णालये मंजूर झाल्यास सार्वजनिक आरोग्य सेवेवरील
ताण हलका होण्यास मदत होणार आहे.’’

राज्य सरकार अपयशी
केंद्र शासनाने महाराष्ट्रातील दोन कर्मचारी विमा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्याची योजना आखली आहे. यामध्ये पुण्यातील बिबवेवाडी तर कोल्हापूर येथील ईएसआयसी रुग्णालयांचा समावेश आहे. बिबवेवाडी व कोल्हापूर येथील रुग्णालये राज्य सरकारला चालवायला दिले होते. मात्र, राज्य सरकार अपयशी ठरल्याने दोन्ही रुग्णालये केंद्र शासनाने ताब्यात घेतली असून, त्यांच्याद्वारे चालवण्यात येणार आहेत.

आमदार माधुरी मिसाळ नाराज
बिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयाला राज्य सरकारने जागा दिली. हे रुग्णालय चांगल्या प्रकारे चालावे यासाठी आमदार माधुरी मिसाळ प्रयत्नशील होत्या. मुख्यमंत्र्यानीही तसे आश्वासन दिले होते.
परंतु, हे हॉस्पिटल केंद्र सरकारने ताब्यात घेतल्यानंतर अचानक उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याबद्दल स्थानिक नेते आणि मुख्यमंत्र्यांनाही कळविण्यात आले नाही. याबाबत माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रम स्थळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
आमंत्रण न दिल्याने मुख्यमंत्री अथवा आरोग्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या रुग्णालयात डॉक्टर नसल्याने कोणतेच
वैद्यकीय उपचार मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या केंद्र आणि राज्य नेत्यांमधे समन्वय नसल्याचे यातून समोर येत आहे.

Web Title: Increase the number of labor hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.