भीमाशंकर अभयारण्यात शेकरूंच्या संख्येत वाढ (फोटो स्टोरी)
By Admin | Published: July 21, 2016 11:26 AM2016-07-21T11:26:00+5:302016-07-21T11:26:00+5:30
महाराष्ट राज्याचे वन्यप्राणी विषयक मानचिन्ह असलेल्या शेकरूंची भीमाशंकर अभयारण्यात २१४५ संख्या आढळून आली आहे.
निलेश काण्णव
भीमाशंकर, दि. २१ - महाराष्ट राज्याचे वन्यप्राणी विषयक मानचिन्ह असलेल्या शेकरूंची भीमाशंकर अभयारण्यात २१४५ संख्या आढळून आली आहे. मागाच्या वर्षी १९८५ शेकरू आढळून आले होते. राज्यात शेकरूंसाठी प्रसिध्द असलेल्या भीमाशंकर अभयारण्यात दि.२३ मे ते ४ जुन २०१६ दरम्यान शेकरूंची गणना करण्यात आली. शेकरूंची प्रगणना हि घरटी मोजून व प्रत्यक्ष दिसलेल्या शेकरूची नोंद घेवून केली जाते. यावर्षी त्याची जीपीएसमध्ये नोंद घेतली गेली.
या नोंदीमध्ये दिनांक, शेकरूचे घरटे असलेले ठिकाण, घरटे असलेल्या झाडाचे नाव, घरटे नवीन कि जुने, सोडून दिलेले घरटे, पिल्लाचे घरटे, वेळ, घरटयाच्या जवळ शेकरू दिसल्यास त्याचे वर्णन, शेकरूचा टुक - टुक आवाज, अक्षांशरेखांश, घरटयाचा आकार, घरटयांची संख्या अशा प्रकारे सविस्तर नोंदी घेतल्या गेल्या असल्याचे वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे यांनी सांगितले.
प्रगणनेत आढळून आलेल्या शेकरूंच्या घरटयाला ६ ने भागल्यानंतर येणारी संख्या ही शेकरूंची संख्या मानली जाते. त्याप्रमाणे भीमाशंकर अभयारण्य क्रं.१ व २ मधिल १९ नियत क्षेत्रात प्रत्येक घरटयाची संख्या व प्रत्यक्ष दिसलेल्या शेकरू संख्या मोजून प्रगणना केली असता १२८७० घरटी दिसून आली त्यानुसार २१४५ शेकरू असल्याचा अंदाज वन्यजिव विभागाने व्यक्त केला आहे. तसेच अभयारण्याचे एकुण वनक्षेत्र ११३.८७ चौरस मीटर असून शेकरूंची प्रति चौरस किलोमीटर १९ संख्या येते.
मागील वर्षी हिच संख्या १७ होती. तसेच मागील वर्षीच्या प्रगणनेत ११९१५ शेकरूंची घरटी म्हणजेच १९८५ शेकरू व ३४२ प्रत्यक्ष शेकरू दिसून आले होते. यावर्षी ४५६ प्रत्यक्ष शेकरू दिसले आहेत. शेकरूंच्या संख्येत तुलनेने चालु वर्षी वाढ झालेली आढळून आली आहे. तसेच भीमाशंकर अभयारण्य क्रं.२ शेकरूं जास्त दिसत नव्हते मात्र यातील डोंगरन्हावे, नांदगाव, खोपिवली या क्षेत्रात प्रत्यक्ष शेकरू दिसून आले आहेत.
शेकरूचे आयुष्य ८ ते ९ वर्षाचे असते. एका शेकरूचे प्रादेशिक क्षेत्र १ ते ५ हेक्टर असते. शेकरू हा झाडांची पाने, डाहळे, काटक्या यांच्या सहाय्याने आपल्या ठरलेल्या क्षेत्रात शेकरू ६ ते ८ घुमटाकार अशी घरटी बनवतो. शेकरू हा शाकाहरी प्राणी असून फळांच्या बिया, गर, फुले, पाने, खोडांच्या आतील साल इत्यादी खातो तसेच शेकरू फार क्वचीतच जमिनीवर येतात. शेकरू प्रामुख्याने करप, आंबा, जांभुळ, माकडलिंबू, अंजन व हिरडा या झाडांवर घरटे बांधतात.
अभयारण्य क्षेत्रा बाहेरील परंतू अभयारण्या लगतच्या गावांमधील खाजगी वनांमध्ये असलेल्या शेकरूंचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये झाडांच्या अच्छारीत क्षेत्राची सलगता जपण्यासाठी म्हणजेच झाडांची तोड होवू नये म्हणून लोकांनाही शेकरूंच्या संवर्धनामध्ये सहभागी करुन घेतले जाणार आहे. यासाठी गावोगावी ग्राम परिसर विकास समिती मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच शेकरूला आवडत असलेल्या अंजन, करप, आंबा, फणसाडा, माकडलिंबू या झाडांचे संवर्धन करण्यासाठी वन्यजिव विभाग लोकसहभागातून या झाडांची संख्या वाढविणार असल्याचे वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांनी सांगितले.