वृक्ष लावणाऱ्या हातांची संख्या वाढवा
By Admin | Published: July 5, 2017 04:10 AM2017-07-05T04:10:35+5:302017-07-05T04:10:35+5:30
महाराष्ट्रात मराठवाडा विभागात सर्वांत कमी जंगल शिल्लक राहिले आहे. हा परिसर हिरवागार करण्यासाठी वृक्षलागवड गरजेची
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद (जि. औरंगाबाद) : महाराष्ट्रात मराठवाडा विभागात सर्वांत कमी जंगल शिल्लक राहिले आहे. हा परिसर हिरवागार करण्यासाठी वृक्षलागवड गरजेची आहे. सध्या वृक्षारोपण हा सरकारी उपक्रम राहिला नसून, एक लोकचळवळ झाली आहे. त्यामुळे झाडे कापणाऱ्या हातांपेक्षा झाडे लावणाऱ्यांची संख्या वाढवा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
दौलताबादजवळील अब्दीमंडी गावाच्या वनक्षेत्रातील ६५ हेक्टर क्षेत्रावर संरक्षण मंत्रालय व राज्य वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्यातील पहिल्या इको टास्क फोर्स बटालियनचा शुभारंभ तसेच ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंर्तगत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी यावेळी ते बोलत होते.
मंगळवारपर्यंत राज्यात २ कोटी १९ लक्ष १५ हजार २९६ वृक्षलागवड झाली आहे. औरंगाबाद विभागामध्येही ४५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून ते लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वनविभागाने हॅलो फॉरेस्ट १९२६ हा टोल फ्री नंबर सुरू केला असून, कुठेही अवैध वृक्षतोड किंवा वन्यप्राण्यांची कत्तल होत असेल, तर या नंबरवर संपर्क साधल्यास वन विभाग त्वरित कारवाई करील, अशी माहिती वनमंत्र्यांनी यावेळी दिली.
बुके नव्हे, रोप भेट द्या
वन विभागाने यानंतर कुठल्याही कार्यक्रमात पुष्पगुच्छ किंवा बुके न देण्याची संकल्पना आणली असून, पुष्पगुच्छऐवजी वृक्षाचे रोप किंवा वन विभागाशी संबंधित पुस्तक द्यावे, अस आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
मराठवाड्यात केवळ
४.९० टक्के वनक्षेत्र
मराठवाड्यात सध्या केवळ ४.९० टक्के वनक्षेत्र आहे. औरंगाबादसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील वन परिक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात लष्कराच्या मदतीने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.