आयटीआय प्रवेशासाठीच्या ऑनलाईन नोंदणीत वाढ
By Admin | Published: July 11, 2016 07:47 PM2016-07-11T19:47:38+5:302016-07-11T19:47:38+5:30
यंदा आयटीआय प्रवेशासाठी विभागातील एकूण जागांच्या तुलनेत तब्बल साडेतीन पट जास्तीची आॅनलाईन नोंदणी झाली.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 11- यंदा आयटीआय प्रवेशासाठी विभागातील एकूण जागांच्या तुलनेत तब्बल साडेतीन पट जास्तीची आॅनलाईन नोंदणी झाली. आज सोमवारी आॅनलाईन नोंदणीची शेवटची मुदत होती. मराठवाड्यातील ८२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १९ हजार जागांसाठी ७० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उद्या अंतीम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर १४ जुलैपासून प्रत्यक्ष प्रवेश फेरीला सुरूवात होईल.
शून्य गुणासंबंधीचा निकाल
आयटीआयच्या तिसऱ्या सत्राच्या पेपरमध्ये जवळपास ३०० पेक्षा जास्त मुलांना शून्य गुण मिळाले आहेत. ही चूक संगणकीय नोंदीमुळे झाली असून दोन- तीन दिवसांत यासंबंधीचा निकाल अपेक्षित असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. तथापि, चांगला पेपर लिहिल्यानंतरही शून्य गुण मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सहसंचालकांना निवेदन सादर केले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्राच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये शून्य गुण मिळाले आहेत. यासंदर्भात मे महिन्यांपासून संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक डॉ. रविंद्र बाळापूरे यांची भेट घेऊन यासंबंधीचा जाब विचारला. त्यावेळी ५ ते ७ दिवसांत चुकीची दुरुस्ती होईल, असे सांगितले होते. दोन महिन्यांचा कालावधी लोटला; पण अद्यापही शून्य गुणांचा तिढा कायम आहे. आज सोमवारी भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन झवेरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सहसंचालक डॉ. बाळापुरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. शेवटी प्राचार्य इंदिरेश भिलेगावकर यांनी भाजयुमोच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले.
आयटीआयह्णच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याची जबाबदारी दिल्ली येथील एका संगणकीय संस्थेकडे देण्यात आली आहे. सदरील विद्यार्थ्यांचे केवळ इंटरनल मार्क्स त्या संस्थेकडे पोहोचले असावेत. त्यांना लेखी परीक्षेचे मार्क्स मिळाले नसतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना शून्य गुण दिले असावेत, अशी माहिती त्यांना देण्यात आली. दरम्यान, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन झवेरी, राहुल नरोटे, मयूर वंजारी, महेश राऊत, संकेत प्रधान, युवराज सिद्ध यांच्या शिष्टमंडळाला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या निरीक्षकांनी लेखी कळविले की, येत्या दोन-तीन दिवसांत विद्यार्थ्यांना मिळालेल्या शून्य गुणांची दुरुस्ती होईल. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे कळविली जातील.