चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधीमध्ये वाढ
By admin | Published: January 15, 2016 01:45 AM2016-01-15T01:45:40+5:302016-01-15T01:45:40+5:30
लिपिक संवर्गात गट ड कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची सध्याची २५ टक्क्यांची मर्यादा ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना
मुंबई : लिपिक संवर्गात गट ड कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची सध्याची २५ टक्क्यांची मर्यादा ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
याच शासननिर्णयात गट ड संवर्गातील जे कर्मचारी शालांत परीक्षा उत्तीर्ण आहेत, पण टंकलेखन/संगणक अर्हताधारक नाहीत, त्यांना ही अर्हता प्राप्त करून घेण्यासाठी दोन वर्षांचा अवधी देण्यात येणार आहे, तसेच जे शालांत परीक्षा उत्तीर्ण नाहीत, त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण तीन संधी व एक वर्षाची अध्ययन रजा मंजूर करण्यात येईल.
गट ड मधील ज्या कर्मचाऱ्यांना वाहनचालक व्हायचे आहे, त्यांना आवश्यक अर्हता धारण करण्यासाठी एक महिन्याची अध्ययन रजा मंजूर करण्यात येणार आहे. वाहनचालक संवर्गातील जे कर्मचारी लिपिक-टंकलेखक पदाची अर्हता धारण करत आहेत, त्यांना लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती देण्यासंदर्भात सेवा प्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील.
गट ड संवर्गात मंजूर पदांपैकी २५ टक्के पदे रद्द करण्यासाठी प्रशासकीय विभागांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
(विशेष प्रतिनिधी)