वातावरणामुळे मूळव्याधीच्या रुग्णांत वाढ
By Admin | Published: July 21, 2016 12:34 AM2016-07-21T00:34:53+5:302016-07-21T00:34:53+5:30
पावसाळ्याच्या सुरुवातीला विविध संसर्गजन्य आजारांबरोबरच मूळव्याधीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे चित्र शहरात आहे.
पुणे : पावसाळ्याच्या सुरुवातीला विविध संसर्गजन्य आजारांबरोबरच मूळव्याधीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे चित्र शहरात आहे. मूळव्याधीच्या समस्येच्या रुग्णांत वाढ झाल्याने या रुग्णांची दवाखान्यांमध्ये गर्दी होताना दिसत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात शहराच्या विविध भागात उपलब्ध होेणाऱ्या पिण्याच्या अशुद्ध पाण्यामुळे पोटाचे विविध विकार किंवा बद्धकोष्ठता होते. पावसाळ्यात बाहेर थंड हवा असल्याने पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
बद्धकोष्ठता हे मूळव्याधीचे महत्त्वाचे कारण असल्याचे जनरल फिजिशियन डॉ. अच्युत जोशी
यांनी सांगितले. मूळव्याधीची समस्या अनेकदा आनुवंशिकही
असू शकते.
या आजारामध्ये विविध कारणांनी रक्तवाहिन्यांची वाढ होते आणि शौैचास त्रास होतो, त्याला आपण मूळव्याध झाली असे संबोधतो. यामध्ये कुंथणे, यकृताच्या समस्या, लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे रक्तवाहिन्यांची वाढ होते. या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साठून राहिल्याने गुदद्वारामध्ये आग होणे, शौैचाच्या वेळी रक्त पडणे, खडा होणे, एकावेळी पोट योग्य पद्धतीने साफ न होणे अशा समस्या उद्भवतात.
यामध्येही ग्रेड १ पासून ग्रेड ४ पर्यंत प्रकार असल्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. सचिन कुबेर यांनी सांगितले. पहिल्या व दुसऱ्या ग्रेडमध्ये आजार असले, तर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते. परंतु, तिसऱ्या आणि चौैथ्या ग्रेडमध्ये मात्र शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय अनेकदा नसतो.
हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच आहारावर योग्य ते नियंत्रण ठेवणे आणि जीवनशैलीत काही बदल केल्यास हा
आजार आटोक्यात राहू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
>मूळव्याधीचा त्रास कमी होण्यासाठी हे करा
भरपूर पाणी प्या.
तेलकट आणि मसालेदार खाणे कमी करा.
जेवणाच्या वेळा नियमित ठेवा
आहारात पालेभाज्या, फळे योग्य प्रमाणात असू द्या.
नियमित व्यायाम करा.
हिरवी व लाल मिरची यांचा आहारातील वापर मर्यादित ठेवा.
दही, ताक, काळे मनुका या थंड पदार्थांचा आहारात समावेश असू द्या.
>बैठेकाम करणे हेही मूळव्याधीचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. सध्या आयटीमध्ये काम करणाऱ्यांना दीर्घकाळ एकाच जागेवर बसावे लागत असल्याने, तसेच दुचाकीवर बराच काळ बसल्यानेही मूळव्याधीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ठराविक काळाने जागेवरून उठून थोडे चालून येणे गरजेचे आहे.
गर्भवती महिलांमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. पुरेशी झोप न होणे, अवेळी खाणे यांमुळे वारंवार पित्त वाढल्यानेही मूळव्याधीचा त्रास होतो. त्यामुळे असा त्रास झाल्यास त्यावर घरगुती उपाय न करता किंवा दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.