शेतकऱ्यांच्या कर्जाचा टक्का वाढवा
By admin | Published: May 12, 2016 03:04 AM2016-05-12T03:04:35+5:302016-05-12T03:04:35+5:30
सहकारी बँकांप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकांनी कृषी कर्जाचा टक्का वाढवित किमान ८० टक्के शेतकऱ्यांना कर्जाचा फायदा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
मुंबई : सहकारी बँकांप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकांनी कृषी कर्जाचा टक्का वाढवित किमान ८० टक्के शेतकऱ्यांना कर्जाचा फायदा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर झाली. तीत कृषी कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. आता जे शेतकरी संस्थात्मक कर्जपुरवठ्याबाहेर गेले आहेत, त्यांना पुन्हा या व्यवस्थेत आणण्यासाठी बँकर्स समितीने विशेष प्रयत्न करण्याची गरज असून, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्यावरही बँकांनी लक्ष द्यावे.
बँकांनी शेतकऱ्यांना करण्यात येत असलेल्या पतपुरवठ्याच्या रकमांवर नाही तर लाभधारक शेतकऱ्यांच्या संख्येवर लक्ष केंद्रित करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. बैठकीस सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष सुशील मुनोत, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा आदी उपस्थित होते. ज्या बँकांनी पतपुरवठ्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले त्या बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)