थंडीत तापमानात घट होण्याऐवजी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 06:56 AM2019-12-19T06:56:52+5:302019-12-19T06:57:00+5:30
थंडीची प्रतीक्षा; १९ अंशावर घसरलेला मुंबईचा किमान तापमानाचा पारा २२ अंशावर
मुंबई : राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १२.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबईचे किमान तापमान कमी होणे अपेक्षित असताना त्यात वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मुंबईच्या किमान तापमानात १ अंशाची वाढ झाली आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान २१ अंश नोंदविण्यात आले होते. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी मुंबईच्या किमान तापमानात २ अंशाची वाढ नोंदविण्यात आली. सोमवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले होते.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. १९ ते २२ डिसेंबरला गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. गुरुवारसह शुक्रवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २३ अंशाच्या आसपास राहील.