पेट्रोल पंपांवरील कारवाईची व्याप्ती वाढणार
By admin | Published: June 21, 2017 03:04 AM2017-06-21T03:04:38+5:302017-06-21T03:04:38+5:30
कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास शंभर पेट्रोल पंपांची माहिती पोलिसांकडे तयार आहे.
वाहनांमध्ये पेट्रोल टाकणाऱ्या मशिनच्या पल्सर असेंब्लीमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप लावून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी शुक्रवारपासून कारवाईला सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत ठाण्यातील सहा, नाशिकमध्ये दोन तर पुणे आणि खोपोली येथील प्रत्येकी एक अशा १० पेट्रोलपंपांवर धाडी टाकण्यात आल्या. मंगळवारी बदलापूर आणि मानपाडा येथील दोन पंपांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली.
ही कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. पोलिसांनी महिनाभर या चौर्यकर्माचा अभ्यास करून राज्यभरातील जवळपास १०० पंपांची यादी तयार केली आहे. प्रत्यक्ष कारवाई यापेक्षाही जास्त पंपांवर होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कारवाई सुरू करण्यापूर्वी पोलिसांनी बऱ्यापैकी खबरदारीही घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वजन व मापे निरीक्षण विभागास उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून कारवाईबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या विभागाकडून पेट्रोल पंपांचे नियमित निरीक्षण केले जात असते. निरीक्षण केल्यानंतर वाहनांमध्ये पेट्रोल भरणाऱ्या मशीनमध्ये हेराफेरी होऊ नये, यासाठी ती सील केली जात असते. आता पोलिसांची कारवाई सुरू राहील, तोपर्यंत पंपांवरील मशिन्सचे सील काढू नये, अशी सूचना या विभागास दिल्या आहेत.
शेट्येला उत्तर प्रदेशातून आणणार
उत्तर प्रदेशचे विशेष कृती दल आणि ठाणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये डोंबिवलीच्या विवेक शेट्येसह दोघांना २२ मे रोजी अटक केली होती. दोन्ही आरोपी सध्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत आहेत.
विवेक शेट्येचे डोंबिवलीमध्ये वर्कशॉप असून, त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक चिप्सचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याने उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांनाही इलेक्ट्रॉनिक चिप्सचा पुरवठा केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे चौकशीसाठी विवेक शेट्येला ठाणे पोलीस ताब्यात घेण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहेत.
बदलापुरातील पेट्राल पंप सील
बदलापूर कात्रप परिसरातील मंगळवारी फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या पंपवरील प्रत्येक मशिनमध्ये पासवर्ड टाकून त्याद्वारे ग्राहकांना कमी इंधन दिले जात होते. हा प्रकार उघड झाल्यावर पोलिसांनी पंप सील केला आहे. येथे प्रत्येक ५ लीटरमागे २०० एमएल कमी पेट्रोल देण्यात येत होते. मराठवाडा, खान्देश रडारवर
ठाणे पोलिसांची चार पथके सध्या मराठवाडा आणि खान्देश भागात आहेत. त्या भागातील काही पेट्रोल पंपांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत येथील पंपांवर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.