येऊर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवा

By Admin | Published: June 13, 2016 03:52 AM2016-06-13T03:52:30+5:302016-06-13T03:52:30+5:30

ठाणे महापालिकेने हार्ट आॅफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व निसर्गाचे वरदान लाभलेल्या येऊर यापर्यटनस्थळाकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे

Increase security in the Junkyard area | येऊर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवा

येऊर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवा

googlenewsNext

सुरेश लोखंडे,

ठाणे- पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिकेने हार्ट आॅफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व निसर्गाचे वरदान लाभलेल्या येऊर या पर्यटनस्थळाकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. याशिवाय, अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे.
साफसफाईअभावी येऊरच्या बहुतांश परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. २४ तास वन विभागाचे लक्ष असतानाही चोरीच्या मार्गे युवक येऊरच्या जंगलात येतात. त्यांच्याकडून या वनराईचेही नुकसान होऊन या पर्यटनस्थळाच्या प्रदूषणात वाढ होते. त्यास नियंत्रणात आणण्याची गरज आहे.
संभाव्य धोके लक्षात घेऊन महापालिकेने या परिसराकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीशी सामना करण्यासाठी या परिसरात आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन कक्ष सुरू करण्याचीदेखील या परिसरात गरज आहे. मोबाइलही या परिसरात लागत नाही. हवाई दलाचे येथे कार्यालय आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत या परिसरात कुठे काय होते, याचा थांगपत्ताही नसतो. ते नियंत्रणात ठेवून संभाव्य धोके टाळण्यासाठी आपत्ती नियंत्रणाची गरज आहे.
ठाणे महापालिकेच्या नियंत्रणात असलेल्या येऊरला शहरातील सोयीसुविधांचा अभाव आहेच. येऊरगाव, पाटीलपाडा, जांभूळपाडा, वनीचापाडा आदी सहा गावपाडे असलेल्या या जंगल परिसरात राजकीय नेत्यांचे बंगलेही
आहेत. सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीच्या परिसरात शनिवार, रविवार आणि सुटीच्या कालावधीत मोठ्या संख्येने युवकयुवती
येतात. त्यांचा अक्षरश: धिंगाणा सुरू असतो.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेला येऊर हा डोंगरदऱ्याखोऱ्यांचा परिसर आहे. प्रवेश बंद असलेल्या या जंगलात बिबट्यांचा वावर असतो. अंधाराचा फायदा घेऊन बिबट्यांनी रहिवासी क्षेत्रात शिरकाव केल्याच्या घटना आजवर घडलेल्या आहेत. या जंगलात शेवट असलेल्या दोन आदिवासी पाड्यांना तर वीजपुरवठ्याचा अद्यापही अभाव असल्यामुळे पावसाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नरेश मोगरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
>गावपाड्यात राबवली स्वच्छता मोहीम
ठाणे : स्वच्छ भारत मिशनद्वारे वन्यजीव संरक्षक जंगल, राखीव वन क्षेत्रात स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे आदेश केंद्रीय मंत्रिमंडळाने दिले आहेत. त्यानुसार, पर्यावरण दिनाचे औचित्य लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या घनकचरा स्वच्छता विभाग व येऊर वन विभागाच्या वतीने रविवारी येऊरच्या जंगलासह परिसरातील गावपाड्यांत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. सुमारे चार गाड्या कचरा उचलला. येऊरगाव, पाटणपाडा, वनीचापाडा या रहिवासी भागांसह जंगलातील पिकनिक पॉइंटवरील कचरा गोळा करण्यात आला. पालिका उपायुक्त अशोक बुरकुले, घनकचरा विभागाचे प्रमुख राजेंद्र बनसोड, उपविभागप्रमुख जी.बी. खिल्लारे, वनसंरक्षक वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. पालिकेच्या २८ व वन विभागाच्या २० कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्यात आली.
येऊरच्या जंगलात फिरण्यासाठी, मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा केला जातो. पाणी, मद्य, शीतपेयांच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या पिकनिक पॉइंटवर मोठ्या प्रमाणात आढळून आल्या.
या कचऱ्यासह गावपाड्यांतील ठिकठिकाणी साचलेला कचरा जेसीबीद्वारे उचलण्यात आल्याचे खिल्लारे यांनी सांगितले. याआधीदेखील जल दिनाचे औचित्य साधून पाणीपुरवठा करणारे तलाव, जंगलातील नाले, जलवाहिनीजवळील कचराही उचलण्यात आला होता.
पर्यावरण दिनानिमित्ताची ही मोहीम १५ जूनपर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर केल्यामुळे रविवारी सुटीच्या दिवशीही मोहीम हाती घेतल्याचे खिल्लारे यांनी सांगितले.

Web Title: Increase security in the Junkyard area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.