राजर्षींचा आदर्श घेऊन विकासाची गती वाढवा

By admin | Published: May 19, 2017 12:59 AM2017-05-19T00:59:02+5:302017-05-19T00:59:02+5:30

शाहू छत्रपती : कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या विशेष टपाल पाकिटाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Increase the speed of development by taking Rajarshi ideals | राजर्षींचा आदर्श घेऊन विकासाची गती वाढवा

राजर्षींचा आदर्श घेऊन विकासाची गती वाढवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी नियोजित वेळेत आणि खर्चात रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण केले. ते लक्षात घेऊन सध्या कोल्हापूर रेल्वेस्थानकातील विविध विकासकामे व्हावीत. सर्वसामान्यांना उपयोगी ठरणाऱ्या विकासाची गती वाढविणाऱ्यांवर लोकप्रतिनिधींनी भर द्यावा; अन्यथा लोक शांत बसणार नाहीत, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी गुरुवारी येथे केले.
कोल्हापूरची रेल्वेसेवा आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या स्थानकास १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कोल्हापूर रेल्वेस्थानक येथे आयोजित विशेष टपाल पाकिटाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय होते. महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, कोल्हापुरातील प्रधान डाकघरचे मुख्य अधीक्षक रमेश पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
शाहू छत्रपती म्हणाले, विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन करून कोल्हापूरचा सन्मान केला आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात योग्य नियोजनातून रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण केले. हे स्थानक आजही सुस्थितीत आहे. या स्थानकावर बदलत्या काळानुसार अनेक सुविधा, कामे करावयाची आहेत. त्यासाठी होणारा खर्च आणि लागणारा वेळ यांचे सूक्ष्म नियोजन आणि या कामांच्या पूर्ततेबाबतचे वेळापत्रक निश्चित करावे.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूरच्या स्थानकाची सध्या १७ कोटींची विविध कामे सुरू आहेत. मात्र, अजून अनेक कामे प्रलंबित आहेत. यात स्थानकाच्या इमारतीचे नूतनीकरण, हायटेक स्टेशन आणि कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, आदींचा समावेश आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रस्ताव पाठविण्याचे काम पुणे विभागाकडून लवकर व्हावे.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या अद्ययावतीकरणाची जबाबदारी माझ्यासह खासदार महाडिक यांची असणार आहे. स्थानकावर राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती जपणारे संग्रहालय, कॉफी टेबल बुक करण्याचा विचार होणे महत्त्वाचे आहे. महापौर हसिना फरास यांनी विशेष टपाल पाकिटामुळे कोल्हापूरचा सन्मान झाल्याचे सांगितले, तर प्रधान डाकघरचे मुख्य अधीक्षक रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रमुख उपस्थितांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन झाले. प्रसाद बुरांडे यांनी विशेष कविता सादर केली. रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेमध्ये योगदान देणाऱ्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी रेल्वेचे स्टेशन प्रबंधक सुग्रीव मीना, मध्य रेल्वे विभागीय समितीचे सदस्य समीर शेठ, पुणे विभागीय प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य मोहन शेटे, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, माणिक मंडलिक, आदी उपस्थित होते. रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णात पाटील यांनी आभार मानले.


शिवाजी पुलासारखी अवस्था नको
पुणे-बंगलोरपर्यंत रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, कोल्हापूर-मिरज मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण लवकर करणे, कऱ्हाड-कोल्हापूर आणि कोल्हापूर-बेळगाव थेट रेल्वेमार्ग करणे, रेल्वेमार्गांवरील उड्डाणपुलांची संख्या वाढविणे, आदी कामे लवकर होणे गरजेचे असल्याचे शाहू छत्रपती यांनी सांगितले. ते म्हणाले, संबंधित कामे फार मोठी नाहीत. मात्र, ती महत्त्वाची आहेत. त्यांची अवस्था पर्यायी शिवाजी पुलासारखी होऊ नये. या कामांबाबतचे निर्णय घ्यायला तीन वर्षे लागू नयेत. रेल्वे सेवेचा दर्जा व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. स्थानकाचे आधुनिकीकरण होऊन ते देशात आदर्शवत व्हावे. हेरिटेज प्रॉपर्टीचे महत्त्व सांभाळून त्याचा विकास करावा. त्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी कामाचा वेग वाढवावा.
‘कॉम्बिनेशन’द्वारे कोल्हापूरचा विकास करूया
मी आणि खासदार महाडिक यांनी दिल्लीच्या पातळीवर प्रयत्न करून पर्यायी शिवाजी पुलाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावला. या स्वरूपातील आपले ‘कॉम्बिनेशन’ यापुढेही कायम ठेवून विकास करूया, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. ते म्हणाले, कोल्हापूर-पुणे या सुपरफास्ट रेल्वेला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. त्याला मूर्त रूप देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
असे आहे विशेष टपाल पाकीट
या विशेष टपाल पाकिटावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकाचे छायाचित्र तसेच स्थानकाची १२५ वर्षे पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. मागील बाजूस स्थानकाचा इतिहास थोडक्यात हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये दिला आहे. दरम्यान, कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे नाव ‘श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस’ असे असताना या पाकिटावर केवळ ‘कोल्हापूर रेल्वे १२५ वर्षे पूर्ण’ केल्याचा उल्लेख केला आहे. स्थानकाच्या इमारतीचे छायाचित्र जुने व स्थानकाच्या नावाचा फलक नसणारे वापरले आहे, याबाबत पुणे विभागीय प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य मोहन शेटे यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Increase the speed of development by taking Rajarshi ideals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.