राज्याच्या किमान तापमानात वाढ; काही ठिकाणी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 06:02 AM2020-12-16T06:02:32+5:302020-12-16T06:02:50+5:30
विदर्भाच्या बहुतांश भागात, मराठवाड्याच्या अनेक भागात तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मंगळवारी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.
मुंबई : राज्यात मंगळवारी सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १५.४ अंश नोंदविण्यात आले. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भाच्या बहुतांश भागात, मराठवाड्याच्या अनेक भागात तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मंगळवारी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
पावसाने घेतला विसावा
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर ओसरल्यानंतर मुंबईवर आलेले पावसाचे ढग आता विरले आहेत. परिणामी मागील पाच दिवसांपासून मुंबईत सुरू असलेला हिवाळ्यातल्या पावसाने विसावा घेतला आहे.