मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील तापमानात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:36 AM2018-12-09T02:36:03+5:302018-12-09T02:36:46+5:30
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.
पुणे : मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़ ९ डिसेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, १० ते १२ डिसेंबर दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या किमान तापमानात २ ते ६ अंशापर्यंत वाढ झाली आहे़ सोलापूरमध्ये किमान तापमान २१़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते सरासरीपेक्षा ६ अंशाने अधिक आहे़ मराठवाड्यातील नांदेडमध्ये किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविले असून, ते सरासरीपेक्षा ८़४ अंश सेल्सिअसने जास्त आहे़ विदर्भात अनेक ठिकाणच्या किमान तापमानात १ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़
रविवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी येण्याची शक्यता असून, १० ते १२ डिसेंबर दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.