फळपीक विमा योजनेची मुदत वाढवा
By admin | Published: November 11, 2016 05:39 AM2016-11-11T05:39:53+5:302016-11-11T05:39:53+5:30
५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका सामान्य शेतकऱ्यांनाही बसत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी
मुंबई : ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका सामान्य शेतकऱ्यांनाही बसत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी असल्याने, फळपीक विमा भरण्याची मुदत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची मागणी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे यांनी गुरुवारी केली.
फळपीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत १० नोव्हेंबर रोजी संपली आहे. मात्र, केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्याने शेवटच्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना विमा हफ्ता भरण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना विम्याचा हफ्ता भरता आला नाही. विम्याचे पैसे मुदतीत भरता न आल्यास शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळू शकणार नाही. द्राक्ष, केळी, डाळिंब, आंबा या फळबागांना विम्याचे संरक्षण न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पुढील काही दिवस वैध नोटांचा तुटवडा कायम राहणार असल्याने फळपीक विमा भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. मागील पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना १० हजारांपर्यंतची रक्कम मिळणार असल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांच्या हातावर दीड-दोन हजारांची रक्कम टेकविण्यात आली. शेतकऱ्यांकडून विम्याचा हफ्ता घेऊनही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली सुरू झालेली योजना प्रत्यक्षात विमा कंपन्यांच्या हिताची ठरत आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने योग्य पावले उचलावित, अशी मागणीही वाघमारे यांनी केली. (प्रतिनिधी)