‘जलयुक्त शिवार’मुळे गावोगावी पाणीसाठ्यांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2016 01:54 AM2016-12-30T01:54:33+5:302016-12-30T01:54:33+5:30
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ११३ किलोमीटर लांबीचे खोलीकरण
- समीर देशपांडे, कोल्हापूर
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ११३ किलोमीटर लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यातून ३७ लाख ४५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. कोल्हापूरची पाणीपातळी चांगली असल्याने, या कामाला सातारा आणि सांगली जिल्ह्यांत चांगला वाव असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
गेल्या वर्षीपासून जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात करण्यात आली. सर्व शासकीय योजनांचे एकत्रीकरण करीत, ‘पाणी अडविणे, पाणी जिरविणे’ या कामांना प्राधान्य देत कधी नव्हे ते गाळ काढण्यासाठी प्राधान्य दिले गेले. त्यामुळे गावोगावी वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली. परिणामी, अनेक गावांमध्ये पाणीसाठ्यांत वाढ झाली, तर काही ठिकाणी पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. गतवर्षी पाऊस लांबला होता, त्यामुळे गाळ काढण्याच्या मोहिमेने गती घेतली होती. यंदा या अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील २१०, सांगली जिल्ह्यातील १४०, तर कोल्हापूर जिल्ह्यातील २० गावे निवडली आहेत. या एकूण ३७० गावांपैकी २६० गावांमध्ये लोकसहभागातून कामे सुरू झाली आहेत. कामांची एकूण संख्या ७९२ असून, त्यातील ४५२ लोकसहभागाची व ३४० शासकीय कामे आहेत. या तिन्ही जिल्ह्यांत १२ कोटी ५५ लाख रुपयांची ही कामे झाली आहेत.
राजस्थानचे पथक पाहणीसाठी येणार
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणलोट क्षेत्रात झालेले काम पाहण्यासाठी, तसेच कृषी योजनांचा आढावा घेण्यासाठी राजस्थानचे ग्रामविकासमंत्री राजेंद्रसिंग राठोड यांच्यासह ३० जणांचे पथक ४ आणि ५ जानेवारीला येत आहे.
सिद्धिविनायक व साई संस्थानकडून निधी
मुंबई येथील श्री सिद्धिविनायक ट्रस्ट व श्री साईबाबा संस्थान, शिर्डी या दोन देवस्थानांनी जलयुक्त शिवारसाठी देणगी दिली होती. त्यातील सुमारे चार कोटी रुपयांचा निधी हा कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना मिळाला आहे. त्यातून या दोन जिल्ह्यांत ८६ कामे सुरू करण्यात आली आहेत.