रक्तक्षयामुळेही मातामृत्यूच्या प्रमाणात वाढ
By admin | Published: July 5, 2016 01:04 AM2016-07-05T01:04:42+5:302016-07-05T01:04:42+5:30
राज्यात मातामृत्यूमधील मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू हे रक्तक्षयाने (अॅनिमिया) होत असल्याचे राज्य शासनाच्या अहवालातून समोर आले आहे. मागील चार वर्षांची आकडेवारी पाहता
पुणे : राज्यात मातामृत्यूमधील मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू हे रक्तक्षयाने (अॅनिमिया) होत असल्याचे राज्य शासनाच्या अहवालातून समोर आले आहे. मागील चार वर्षांची आकडेवारी पाहता गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षयाची समस्या जास्त असल्याचे दिसते. ग्रामीण किंवा दुर्गम भागात गर्भवती महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे या आकडेवारीतून समोर येत आहे.
साधारणत: व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ ते १४ असणे आवश्यक असते. त्यातही महिला गर्भवती असताना हे प्रमाण योग्य असणे अत्यावश्यक असते. मात्र महिलांमध्ये आजही आहाराबाबत पुरेशी जागरूकता नसल्याने हे प्रमाण कमी असल्याचे आढळते. अनेक गर्भवती स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी सहा किंवा सात असल्याचे दिसते. त्यामुळे १५ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये रक्तक्षय मोठ्या प्रमाणात आढळते. राज्याच्या २०१२ ते २०१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार मातामृत्यूचे प्रमाण जिल्हा आणि महापालिका स्तरावर जास्त आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य विभागाकडून योजना सुरू
दीर्घकाळ शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल तर रक्तदाब कमी होणे, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारखी लक्षणे महिलांमध्ये दिसू लागतात. सात मिलीग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबिन असणाऱ्या महिलांना रक्तक्षय आहे, असे समजले जाते.
मातामृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य आरोग्य विभागाकडून नवसंजीवनी योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना यांसारख्या योजना राबविल्या जातात.
- डॉ. दिगंबर कानगुले, प्रमुख-माता व बालविकास विभाग