‘आॅन द स्पॉट’ दंडासाठी आता वाढीव मुदत
By admin | Published: November 12, 2016 03:51 AM2016-11-12T03:51:16+5:302016-11-12T03:51:16+5:30
काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मुंबई वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या
वाहनचालकांवर करण्यात येणाऱ्या ‘आॅन द स्पॉट’ कारवाईवरही परिणाम होत आहे. वाहतूक पोलिसांकडून
या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दंड आकारताना वाहनचालकांकडून ५00 आणि
१000 रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी शक्कल लढवली असून, नव्या नोटा किंवा सुटे पैसे घेऊन सात दिवसांत
दंड भरण्याची मुभा दिली जात
आहे. १६ आॅगस्टपासून मुंबई वाहतूक पोलिसांनी नवीन दंड आकारणी करण्याचा निर्णय घेतला. यात दंडाच्या रकमेत चांगलीच वाढ झालेली आहे. त्यामुळे विना हेल्मेट, फॅन्सी नंबर प्लेट, वेगाने वाहन चालविणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, रेसिंग, टेल लाईट्स व रिफ्लेक्टरशिवाय वाहन चालवणे याशिवाय अन्य नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडून ५00 ते १000 रुपये दंड आकारला जातो. हा निर्णय लागू झाल्यामुळे चालकांमध्ये चांगलीच धास्ती लागून आहे.
मात्र ९ नोव्हेंबरपासून याच गुन्ह्यांखाली आॅन द स्पॉट कारवाई करून दंड वसूल करताना मुंबई वाहतूक पोलिसांची पंचाईत होत आहे. ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दंडात्मक कारवाई करताना या नोटा घेऊ नका, अशा सूचनाच वाहतूक पोलिसांना करण्यात आल्या. त्याऐवजी लायसन्स घेऊन आणि चलान देऊन वाहनचालकांना नव्या नोटा किंवा सुटे पैसे घेऊनच चौकीवर बोलावण्यात येत आहे. मात्र सुट्या पैशांचा असलेला अभाव यामुळे चालकांना दंड भरताना नाकीनऊ येत आहे.
ही बाब हेरून पाच ते सात दिवसांत दंड भरण्याची मुभा वाहनचालकांना देण्यात आली आहे.