तयार घरांना वाढती मागणी, दिवाळीत घरखरेदीकडे कल : बांधकामाधीन घरांना जीएसटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:51 AM2017-10-18T04:51:59+5:302017-10-18T04:52:15+5:30
वस्तू व सेवा कराच्या कक्षेत येऊ घातलेल्या रिअल इस्टेट मार्केटला दिवाळीच्या मुहूर्तावर चांगलीच झळाळी आली आहे. ओसी मिळालेली व तयार स्थितीत असलेली घरे जीएसटीच्या कक्षेतून बाहेर असल्याने तया घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
मुंबई : वस्तू व सेवा कराच्या कक्षेत येऊ घातलेल्या रिअल इस्टेट मार्केटला दिवाळीच्या मुहूर्तावर चांगलीच झळाळी आली आहे. ओसी मिळालेली व तयार स्थितीत असलेली घरे जीएसटीच्या कक्षेतून बाहेर असल्याने तया घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याउलट बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या बुकिंगसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासकांकडून विविध आॅफर्सची प्रलोभने दाखवली जात आहेत.
विकासकांची संघटना असलेल्या नरेडकोचे उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांनी सांगितले की, जीएसटीच्या कक्षेतून बाहेर असलेल्या तयार घरांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. याउलट बांधकाम सुरू असलेल्या घरांवर जीएसटीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. जीएसटीमुळे घरांच्या किमती कमी होण्याचा सरकारचा दावा आहे. मात्र तसे प्रत्यक्षात दिसत नाही. याउलट रेरामुळे घरांच्या विक्रीला दिवाळीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेरा रजिस्ट्रेशन क्रमांकामुळे ग्राहकांमध्ये विकासकांप्रतिचा विश्वास वाढल्याचे दिसत आहे. मात्र रेरानंतर उभारी घेणारे रिअल इस्टेट क्षेत्राचे जीएसटीमुळे पुन्हा कंबरडे मोडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, जीएसटीचा परिणाम जाणवू नये, म्हणून विकासकांकडून घरांच्या बुकिंगवर मोठ्या प्रमाणात आॅफर्स देण्यात येत आहेत. त्यात रजिस्ट्रेशन मोफत करण्यापासून गृहोपयोगी वस्तू, दुचाकी, चारचाकी आणि इतर अनेक सोयी-सुविधा पुरवण्याची तयारी विकासक दाखवत आहेत. बहुतेक विकासकांनी कमी व्याजदरावर गृहकर्ज पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नोटाबंदीनंतर बराच काळ थंडावलेल्या रिअल इस्टेटचा बाजार आता कुठे गरम होऊ लागला आहे.