गरज भासल्यास कुंभमेळ्यासाठी वाढीव निधी - मुख्यमंत्री
By admin | Published: August 19, 2015 04:03 PM2015-08-19T16:03:32+5:302015-08-19T16:03:32+5:30
कुंभमेळा हा जागतिक आस्थेचे प्रतीक असलेला सोहळा आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आत्तापर्यंत राज्य शासनाने आर्थिक मदत कमी पडू दिली नाही. आणखी काही कामांच्या
- अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रवेशद्वाराचे लोकार्पण
नाशिक : कुंभमेळा हा जागतिक आस्थेचे प्रतीक असलेला सोहळा आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आत्तापर्यंत राज्य शासनाने आर्थिक मदत कमी पडू दिली नाही. आणखी काही कामांच्या पूर्ततेसाठी निधीची गरज भासल्यास वाढीव निधी दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या साधुग्राममध्ये वैष्णव आखाड्यांचे ध्वजारोहण फडणवीस आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर नाशिक महापालिकेने साधुग्रामच्या प्रारंभीच साकारलेल्या आकर्षक प. पू. जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी झालेल्या मुख्य सोहळ्यात फडणवीस बोलत होते.
कोणत्याही निमंत्रणाशिवाय होणारा भाविकांचा कुंभमेळा हे या सोहळ्याचे वेगळेपण असते, परंतु त्याचबरोबर साधू संतांच्या सेवेची संधी प्राप्त होत असते. महाराष्ट्रात होत असलेल्या या कुंभमेळ्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दखल घेत हा कुंभमेळा यशस्वी झाला पाहिजे त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधांमध्ये त्रुटी राहू देऊ नये असे मला सांगितले होते. त्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यानंतर नागरिक निश्चितच या राज्याचे कौतुकाने नाव घेतील असा विश्वास व्यक्त करून फडणवीस यांनी आत्तापर्यंत कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी दिला आहे. आणखी काही कामे शिल्लक असल्यास त्यासाठीदेखील निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगून फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या तयारीत काही त्रुटी झाल्यास करुणामयी साधू संतांनी माफ करावे असेही सांगितले.
यावेळी बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी कुंभमेळ्याचे व्यवस्थापन हा व्यवस्थापन शास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचा भाग असल्याचे सांगितले. कुंभमेळ्याची तिथी व मुहूर्त कधी ठरतो हे कोणालाच ठाऊक नसते परंतु तरीही कोणालाही कोणतेही निमंत्रण न देता करोडो हिंदू धर्मीय अगदी मुहूर्तावर या सोहळ्यास हजेरी लावतात, ही गोष्टच अद्भुत असून त्यासाठी येणाऱ्या करोडो लोकांची व्यवस्था करणे हेदेखील आश्चर्यकारक आहे. त्यामुळेच कुंभमेळा हा एकमेव उत्सव हिंदू धर्मीयांसाठी शाश्वत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी नाशिकचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी कुंभमेळ्यासाठी चार वर्षांपूर्वीच आराखडा तयार करून तीन वर्षांपूर्वीच कामे सुरू केली होती, तत्कालीन राज्य सरकारने त्यासाठी हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला होता, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात रस्ते जोडणी, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन विकास ही कामे वेगाने झाली असल्याचे सांगितले.