गॅस दरवाढीने मुंबईकरांचा पारा वाढला !
By admin | Published: March 4, 2017 02:07 AM2017-03-04T02:07:55+5:302017-03-04T02:07:55+5:30
मुंबईच्या तापमानात घरगुती गॅसची दरवाढ आणि खासगी बँकांनी सुरू केलेली भरमसाठ शुल्कवाढीची भर पडल्याने मुंबईकरांचा पारा चांगलाच वाढला आहे.
मुंबई : मुंबईच्या तापमानात घरगुती गॅसची दरवाढ आणि खासगी बँकांनी सुरू केलेली भरमसाठ शुल्कवाढीची भर पडल्याने मुंबईकरांचा पारा चांगलाच वाढला आहे. या दरवाढ आणि शुल्कवाढीचा सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून खरपूस समाचार घेतला जात आहे. मुंबईकरांची हीच खदखद हेरून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दरवाढीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भविष्यात बँकांसमोरून गेले तरी शुल्क आकारले जाईल, अशा शब्दांत खासगी बँकांनी केलेल्या शुल्कवाढीवरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. याउलट दहशतवाद रोखण्यासाठीच नोटाबंदीप्रमाणे गॅस दरवाढ केल्याचे विनोद सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. एकंदरीतच निवडणुकांनंतर झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांमधून सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. त्याचा फायदा विरोधी पक्ष कितपत घेणार, हे भविष्यात होणाऱ्या आंदोलनांवरून स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)
>आझाद मैदानात निदर्शने
गॅस दरवाढ आणि चारपेक्षा जास्त वेळा बँकेतून पैसे भरणे आणि काढण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून शनिवारी, ४ मार्चला दुपारी १२ वाजता आझाद मैदानात निदर्शने करण्यात येणार आहेत. दरम्यान, बँक शुल्कवाढ आणि गॅस दरवाढीविरोधात नेटकऱ्यांनी जहाल प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सोशल मीडियावर प्रामुख्याने
या दरवाढीमुळे भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्यात आले आहे.