आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 12:53 AM2016-07-22T00:53:52+5:302016-07-22T00:53:52+5:30
भोसरी येथील गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांच्या खूनप्रकरणी दिघी पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांची पोलीस कोठडी
पिंपरी : भोसरी येथील गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांच्या खूनप्रकरणी दिघी पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांची पोलीस कोठडी, तर दोघांची न्यायालयीन कोठडी संपल्याने पुन्हा त्यांना गुरुवारी खडकी न्यायालयात गुरुवारी हजर केले. या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात
आली आहे. सर्व आरोपींना सोमवारपर्यंत (२५ जुलै) पोलीस कोठडी सुनावली आहे.
दत्तात्रय फुगे यांचा दिघी येथे १४ जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास टोळक्याने दगडाने ठेचून निर्घृण खून झाला. फुगे यांना मित्राच्या वाढदिवसाचे निमित्त करून दिघी येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर तलवार, कोयता, चॉपरने वार करण्यासह डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. खुनातील सर्व मारेकरी फरार झाले होते. याप्रकरणी फुगे यांचा मुलगा शुभम फुगे (२१, रा. भोसरी) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार दिघी पोलिसांनी तपास करून पहिले पाच आणि नंतर चार आरोपींना अटक केली. यामध्ये अतुल अमृत मोहिते (२५), सुशांत जालिंदर पवार (२०), अतुल ऊर्फ बल्ली कैलास पठारे (२४, रा. म्हस्के वस्ती, आळंदी रोड), शैलेश सूर्यकांत वाळके (२६, रा. यमाईनगर, दिघी), विशाल दत्ता पारखे (३२, रा. विश्रांतवाडी), निवृत्ती ऊर्फ बाळू किसन वाळके (४५, विठ्ठल मंदिराजवळ, दिघी) आणि प्रेम ऊर्फ कक्का ऊर्फ प्रमोद संताराम ढोलपुरिया (२३, रा. रामनगर, बोपखेल) यांना अटक करून पोलीस कोठडी सुनावली होती. सूत्रधार शोधण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)