सलग सुट्यांनी वाढविले रेल्वेचे वेटिंग
By admin | Published: September 4, 2016 10:23 PM2016-09-04T22:23:07+5:302016-09-04T22:23:22+5:30
सलग सुट्या आल्या की शासकीय कर्मचारी नेहमीच प्रवासाचे प्लॉनिंग करतात.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 4 - सलग सुट्या आल्या की शासकीय कर्मचारी नेहमीच प्रवासाचे प्लॉनिंग करतात. ९ ते १२ सप्टेबर दरम्यान सलग चार सुट्या आल्यामुळेही ही संधी नागपूरकरांनी दवडली नसल्याचे रेल्वेच्या आरक्षणाकडे पाहून लक्षात येते. होय, या चार दिवसात नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती पाहावयास मिळत आहे.
रेल्वेच्या आरक्षणाच्या प्रतीक्षायादीकडे कटाक्ष टाकला असता ९ ते १२ सप्टेबर दरम्यान नागपुरातून जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. ९ तारखेला गौरीपूजनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली सुटी आहे. १० सप्टेबरला सेकंड सॅटरडे, ११ सप्टेबरला रविवार आणि १२ सप्टेबरला बकरी ईद आहे. या चारही दिवस सलग सुट्या आल्यामुळे असंख्य नागपूरकरांनी बाहेरगावी जाण्याचे प्लॉनिंग केले आहे. त्यामुळे नागपुरातून जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे.
या चार दिवसात मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस स्लिपर आणि एसीचे वेटिंग १०६, १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस १३१ वेटिंग असून ११ तारखेला तर तिकीटही मिळणे बंद झाले आहे. १२१३६ नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस ७९ वेटिंग, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस १४४ वेटिंग, १२११४ नागपूर-पुणे गरिबरथ एक्स्प्रेस २६६ वेटिंग आहे. याशिवाय इतर रेल्वेगाड्यात १८२३७ नागपूर-अमृतसर एक्स्प्रेस ७६ वेटिंग, १८२४५ नागपूर-बिकानेर ३५ वेटिंग, १२६१५ नागपूर-हजरत निजामुद्दीन ३४ वेटिंग, १२४०९ नागपूर-हजरत निजामुद्दीन २६ वेटिंग, १५११९ नागपूर-वाराणसी ९ वेटिंग, १२७९१ नागपूर-वाराणसी ४७ एवढी प्रतीक्षायादी झाली आहे. सलग सुट्यांची नागपूरकरांनी आधीच प्लॉनिंग केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून १२ सप्टेबरनंतरच्या गाड्यात आरक्षण उपलब्ध असल्याची स्थिती आहे.