पुणे शहरात पावसाचा जोर वाढला, अनेक रस्त्यांवर साचले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 03:02 PM2017-09-19T15:02:25+5:302017-09-19T15:08:49+5:30
पुणे शहर व परिसरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत आहे.
पुणे, दि. 19 - पुणे शहर व परिसरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत आहे. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. खडकवासला, धनकवडी, कात्रज, सिंहगड रोड परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. शहरातही सकाळी अकरा नंतर पावसाची संततधार सुरु आहे.
मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुणे वेधशाळेत ९ मिमी पावसाची नोंद झाली होती. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून सिग्नल बंद पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.
पावसाचा जोर वाढल्याने काही धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. उजनी धरणातून १० हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून खडकवासला, घोडनदी धरणातून नदीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे़
खडकवासला, सिंहगड, पानशेत, खडकवासला, वरसगाव, टेमघर परिसरात आज सकाळपासून धुवांधार पाऊस सुरू असून ओढे, नाले, नद्या खळखळून वाहत आहेत. रस्त्यावर सखल ठिकाणी आणि रस्त्यावरील खड्ड्यांमधे साठलेल्या पाण्यामुळे वाहतूक संथ झाली असून वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
आज सकाळपासून खडकवासला परिसरात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला जोर कमी होता. सकाळी साडेदहा नंतर पावसाचा जोरदार सुरवात झाली. सिंहगड, पानशेत, वरसगाव, टेमघर,बाहुली, सांगरूण, कुडजे, खडकवाडी, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी आदी परिसरात पावसाचा जोर दुपारपर्यंत चांगला होता. दुपारी बारा वाजेपर्यंत वरसगाव येथे आठ मिमी तर खडकवासला येथे सात मिमी पावसाची नोंद झाली होती.