मुंबईच्या तापमानात वाढ, आर्द्रतेमुळे उकाडा झाला असह्य
By admin | Published: May 4, 2015 02:12 AM2015-05-04T02:12:54+5:302015-05-04T02:12:54+5:30
शहराच्या कमाल तापमानात सरासरी १ ते २ अंशाची वाढ नोंदविण्यात येत असून, मुंबईची आर्द्रता ९० टक्क्यांच्या आसपास पोहचली आहे.
मुंबई : शहराच्या कमाल तापमानात सरासरी १ ते २ अंशाची वाढ नोंदविण्यात येत असून, मुंबईची आर्द्रता ९० टक्क्यांच्या आसपास पोहचली आहे. याचा विपरित परिणाम म्हणून मुंबई तापली असून, वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांना उकाडा असह्य झाला आहे.
मागील आठवड्यात मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३४ अंशावर स्थिरावला होता. तर किमान तापमान २५ ते २७ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत होते. शिवाय आर्द्रताही ७५ टक्क्यांच्या आसपास होती.
मात्र अरबी समुद्राहून शहराकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब होत होता. परिणामी मुंबईतील दुपार तप्त होत होती. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत सांगितले की,
मुंबईच्या कमाल तापमानात सरासरी १ ते २ अंशाची वाढ नोंदविण्यात येत आहे. शिवाय आर्द्रताही ९० टक्क्यांच्या आसपास पोहचली आहे. परिणामी ऊकाड्यात वाढ झाली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील चोवीस तासांमध्ये संपुर्ण राज्यातील हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)