मोबाईल अॅपवरून तिकीट बुकींगला प्रवाशांची वाढती पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 02:45 PM2019-03-09T14:45:16+5:302019-03-09T14:53:43+5:30
मागील वर्षभरात सुमारे पावणे चार लाख प्रवाशांनी युटीएस या अॅपद्वारे अनारक्षित तिकीट काढले. त्यामुळे तिकीट खिडकीवर होणारी प्रवाशांची रांग कमी झाली आहे.
पुणे : मोबाईल अॅपद्वारे रेल्वे तिकीट बुकींग करण्यासाठी प्रवाशांची पसंती वाढू लागली आहे. मागील वर्षभरात सुमारे पावणे चार लाख प्रवाशांनी युटीएस या अॅपद्वारे अनारक्षित तिकीट काढले. त्यामुळे तिकीट खिडकीवर होणारी प्रवाशांची रांग कमी झाली आहे.
मध्य रेल्वेच्या वतीने प्रवाशांच्या सुविधेसाठी युटीएस हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. अनारक्षित तिकीटासाठी बहुतेक स्थानकांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे अनेकदा तिकीट वेळेत न मिळाल्याने प्रवाशांना गाडी मिळण्यात अडचणी येतात. यापार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनाने युटीएस अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे कुठेही जाण्यासाठी अनारक्षित तिकीट काढता येते. दि. ४ एप्रिल २०१८ पासून पुणे विभागातील उपनगरीय स्थानकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर दि. १२ ऑक्टोबर रोजी सर्व स्थानकांसाठी ही सुविधा खुली केली केली. रेल्वे स्थानक इमारत किंवा रेल्वेमागार्पासून दोन किलोमीटर अंतराच्या आत मोबाईलवर अॅपद्वारे तिकीट काढता येते. पुणे विभागात दि. ६ मार्च पर्यंत ३ लाख ७५ हजार ५८६ प्रवाशांना या सेवेचा वापर केला आहे.त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढत चालला आहे.
दरम्यान, युटीएस हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर नोंदणी करणे आवश्यक आहे. अॅपमधील आर वॉलेट रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर तिकीट घेता येते. आर वॉलेटद्वारे तिकीटावर पाच टक्क्यांची सुटही दिली जात आहे. प्रवासादरम्यान अॅपमधील शो टिकीट ऑप्शन मधील तिकीट दाखविणे आवश्यक आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
-------