जिल्ह्यात महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढतेय
By admin | Published: April 8, 2017 01:36 AM2017-04-08T01:36:01+5:302017-04-08T01:36:01+5:30
शहरीकरणामुळे बदलेली लाईफ स्टाईल, शेतांमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर, स्वच्छता यामुळे पुणे जिल्ह्यात महिला जीवघेण्या कॅन्सर आजाराच्या विळख्यात जखडू लागल्या आहेत
नीलेश काण्ण,
घोडेगाव- शहरीकरणामुळे बदलेली लाईफ स्टाईल, शेतांमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर, स्वच्छता यामुळे पुणे जिल्ह्यात महिला जीवघेण्या कॅन्सर आजाराच्या विळख्यात जखडू लागल्या आहेत. त्यात भाजीपाल्याचे आगर असलेल्या तालुक्यांमध्ये व व्यस्त जीवनशैली असलेल्या महिलांमध्ये हा आजार जास्त वाढत आहे.
महिलांना सर्वांत जास्त गर्भाशयमुखाचा कॅन्सर व स्तनाचा कॅन्सर यांना तोंड द्यावे लागते. पुणे, मुंबई येथील अनेक कॅन्सर उपचार केंद्रांत उपचारांसाठी पुरुषांपेक्षा महिलाच जास्त येत आहेत. शहरीकरणामुळे स्तनाचा कॅन्सर, तर अस्वच्छता व तंबाखुजन्य पदार्थ्यांच्या वाढत्या वापरामुळे गर्भाशयमुखाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगावसारख्या तालुक्यांमध्ये बागायती शेतीचे मोठे क्षेत्र आहे. येथील शेतीत रासायनिक खतांच्या औषधांचा वापर सतत होत असतो. या खतांचा परिणाम वापर करणाऱ्यांवर पहिला होतो. नंतर शेतीमाल खाणाऱ्यावर होत असतो. सतत खतांच्या संपर्कात राहिल्याने हाताला खतांचा अंश लागून, पाण्याद्वारे, हवेद्वारे त्याचे शरीरात संक्रमण होते. सध्या पुरुषांपेक्षा महिला शेतीकामात जास्त वेळ घालवतात; त्यामुळे याचा परिणाम महिलांवर लवकर होते. त्यातूनच जुन्नर, आंबेगाव, बारामतीसारख्या तालुक्यांतील महिलांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे.
पुणे जिल्ह्यात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हील सर्जन यांच्या कार्यालयात उपलब्ध नाही. डेंगी, मलेरिया, साथीचे आजार, प्रसूती, विषबाधा यांची आकडेवारी उपलब्ध आहे; मात्र कॅन्सरची आकडेवारी नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याला या आजाराने किती मोठा विळखा घातला आहे, याची कल्पना अजून कोणालाच आलेली नाही. महिला कॅन्सरची तपासणी करून घेण्यासाठी पुढे येत नाही, घाबरतात व फक्त महिलांची कॅन्सरची तपासणी करणे शक्य नाही, अशी कारणे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येतात.
याबाबत वाघोली येथील इंटीग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटरच्या डॉ. श्वेता गुजर यांच्याशी चर्चा केली असता, महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे ही बाब खरी आहे. आमच्या सेंटरमध्ये महिन्याला १५ ते २० महिला कॅन्सरच्या उपचारांसाठी नव्याने येतात. ही बाब चिंताजनक आहे. शहरीकरणामुळे बदललेली जीवनशैली, आहार तसेच योग्य वेळी लग्न न होणे, मुले उशिरा होणे, लहान बाळांना पूर्ण स्तनपान करायला वेळ न मिळणे अशा अनेक कारणांमुळे शहरी भागामध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे, तर अस्वच्छ, अशुद्ध पाणी व आहार तसेच रासायनिक खतांच्या सहवासात जास्त वेळ राहणाऱ्या महिलांमध्ये ग्रामीण भागात कॅन्सर होत आहे. कॅन्सरचा धोका लक्षात घेऊन ४० वर्षांच्या पुढील प्रत्येक महिलेने कॅन्सरची तपासणी करून घेणे आवश्यक आहे व दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
>वैद्यकीय अधीक्षिका डॉ. गीता कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली असता, पूर्वी संसर्गजन्य आजारांनी मरण्याचे प्रमाण जास्त होते; मात्र मागील काही वर्षांत असंसर्गजन्य आजारांनी मृत्यू होताना दिसत आहेत. यासाठी शासनाने एलसीडी प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये कॅन्सर, डायबेटिस, ब्लडप्रेशर, थायरॉईडसारख्या असंसर्गजन्य आजारांचे निदान व उपचार केले जाणार आहेत. शासनाने सांसर्गिक रोग रोखण्यात यश मिळविले. मात्र, असांसर्गिक रोगामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.