कर्जमाफीसाठी सरकारवर वाढता दबाव
By admin | Published: April 4, 2017 05:49 AM2017-04-04T05:49:25+5:302017-04-04T06:55:37+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेला असतानाच आता शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संपाचे हत्यार उपसले आहे
मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेला असतानाच आता शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संपाचे हत्यार उपसले आहे, तर शेतकरी नेत्यांनीही आंदोलनाची हाक दिल्यामुळे सरकारवर दबाव वाढत चालला आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतीमालाला हमीभाव मिळावा, कृषीपंपाचे वीजबिल माफ करावे आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. यासंदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे सोमवारी प्रातिनिधीक ग्रामसभा झाली. या सभेला राज्यातील ४० गावांतील शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे संघटन बांधण्यासाठी राज्यभर ही चळवळ पोहोचविण्याचे पुणतांबा येथील ग्रामसभेत ठरले. सरपंच छाया जोगदंड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. जूनपासून भाजीपाला, दुधाची विक्रीच बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, वैजापूर, धुळे, औरंगाबाद, निफाड आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सात मागण्यांचा ठराव ग्रामसभेने केला. अशाच ग्रामसभा आता गावोगावी होणार असून त्याचा ठराव तहसीलदारांना देण्यात येईल.
विरोधी पक्षनेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा सुरू केली असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी अक्षय्यतृतीयेपासून आंदोलनात उतरणार आहेत. कोल्हापूरपासून त्याची सुरुवात होईल. राष्ट्रीय किसान ऋणमुक्त अभियानांतर्गत संघटनेने साडेसहा लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. त्यात शेती परवडत नसल्याचा निष्कर्ष निघाला. पंतप्रधान व राष्ट्रपतींची भेट मागितली असून त्यांना किसान ऋणमुक्त अभियानाचा अहवाल देणार असल्याचे शेट्टी यांनी लोकमतला सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा
शेतकरी संघटना आणि आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घरापासून ११ एप्रिलपासून एकत्रित शेतकरी आसूड यात्रा काढणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत दिली. यात्रेची सांगता २१ एप्रिलला पंतप्रधानांच्या वडनगर (गुजरात) गावी होणार आहे. सीएम टू पीएम असे हे आसूड आंदोलन होणार आहे. अकार्यक्षम मंत्र्यांच्या गाड्यांना काळे फासण्याचे आंदोलन हाती घेण्यात येईल, असे बच्चू कडू यांनी अकोला येथे सांगितले.
>ही अराजकतेची नांदी
पुणतांब्याची ग्रामसभा ही क्रांतीची सुरवात आहे. शेतकऱ्याने शेतात जायचे नाही, असे ठरविल्याने ही अराजकतेची नांदी ठरणार आहे.
- खा.राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
>चांदवडला लाक्षणिक उपोषण
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चांदवडला (नाशिक) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणात माजी आ. शिरीष कोतवाल, उपसभापती अमोल भालेराव, डॉ. सयाजीराव गायकवाड आदी सहभागी झाले होते.
>टॉवरवर चढून आंदोलन
शेतातील जळालेला डीपी दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी वारंवार खेटे घालूनही निराशा पदरी आलेल्या शिरापुरचे शेतकरी अनिल पाटील यांनी लोकशाही दिनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून आंदोलन केले़
डीपी जळून दोन महिने झाले तरी महावितरणने तो दुरूस्त केला नाही़ महसूल प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.