आयटीआयच्या तासिका निदेशकांच्या मानधनात वाढ, कौशल्य विकासमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 01:48 AM2018-11-18T01:48:22+5:302018-11-18T01:48:42+5:30
आता तासिका मानधन २५० रु. तर प्रात्यक्षिक तासिकेच्या मानधनात १२५ रुपये करण्यात आल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सैद्धांतिक व प्रात्यक्षिक तासिकेसाठी निदेशकांस पूर्वी प्रत्येकी ७२ रु. व ३६ रु. दिले जात होते. आता तासिका मानधन २५० रु. तर प्रात्यक्षिक तासिकेच्या मानधनात १२५ रुपये करण्यात आल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्याच्या दृष्टीने, तसेच तेथील प्रशिक्षणार्थींना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी तासिका तत्त्वावर प्रशिक्षित व अनुभवी निदेशक उपलब्ध करून दिले जातात. औद्योगिक क्षेत्रातील जागतिकीकरण विचारात घेता, कुशल मनुष्यबळाची गरज वाढलेली आहे. त्यास अनुसरून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून शिल्पकारागीर योजनेसोबत विविध योजना राबविण्यात येत आहेत, तसेच आधुनिक तंत्रज्ञावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत, असेही पाटील निलंगेकर म्हणाले.
यासाठी तासिका तत्त्वावर आवश्यक निदेशकांची गरज पाहता पूर्वी मानधन फार कमी होते. त्यामुळे उत्तम प्रतीचे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षक निदेशक त्वरित उपलब्ध होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ही वाढ केली असून, आता तासिका तत्त्वावर उत्तम प्रशिक्षित निदेशक उपलब्ध होणार आहेत. त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढण्यास याची मदत होईल, असे पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
साडेचार कोटी युवकांना प्रशिक्षण
भारत सरकारने मेक इन इंडिया व स्किल इंडिया या प्रमुख योजनांद्वारे सन २०२२ पर्यंत ५० कोटी युवकांना प्रशिक्षित करण्याचे ठरविले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ या धोरणांतर्गत सन २०२२ पर्यंत साडेचार कोटी युवकांना प्रशिक्षित करणार असल्याची माहिती पाटील निलंगेकर यांनी दिली.