सौर कृषी पंप योजनेला वाढता प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2017 12:08 AM2017-05-27T00:08:59+5:302017-05-27T00:08:59+5:30
पश्चिम वऱ्हाडातील चित्र : चौदाशे शेतकऱ्यांनी भरले पैसे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यातील शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत असल्याचे चित्र पश्चिम वऱ्हाडात दिसत आहे. सुरुवातीला जाचक अटींमुळे याकडे पाठ करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत असल्यामुळे या योजनेसाठी तीन जिल्ह्यांतून १ हजार ४०७ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. चार महिन्यांपूर्वीच्या तुलनेत यात ३० टक्के वाढ झाली आहे.
सौर ऊर्जा हा प्र्रकार अपारंपरिक ऊर्जा स्रोत असलेल्या स्रोतांपैकी शाश्वत स्रोत असल्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी सौर कृषी पंप देण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३.५ अथवा ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप केंद्र शासनाच्या ३० टक्के, तर राज्य शासनाच्या पाच टक्के अनुदानासह ६० टक्के कर्ज आणि उर्वरित पाच टक्के शेतकरी हिस्सा या स्वरूपात वितरित करण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा अल्पभूधारक आणि दुर्गम भागात शेती असलेला अर्थात ज्या ठिकाणी सहजतेने वीज उपलब्ध होऊ शकत नाही, अशा भागातील शेती असलेला असणे आवश्यक आहे. त्याशिवाय या योजनेचा फायदा घेण्यासाठी कर्ज मंजुरीसह इतर काही जाचक अटींमुळे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे दुर्गम भागामधील आणि अल्पभूधारक शेतकरी या अटी वगळता शासनाने इतर काही अटी शिथिल केल्यानंतर या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला.
या योजनेत अकोला जिल्ह्यासाठी एक हजार पंपांचे उद्दिष्ट असताना १२०१ शेतकऱ्यांना मागणी पत्र देण्यास सांगण्यात आले. त्यापैकी ४५५ शेतकऱ्यांनी पाच टक्के हिस्सा भरला.
बुलडाणा जिल्ह्यात १६६५ उद्दिष्ट असताना ८८३ शेतकऱ्यांना मागणी पत्र सादर करण्यास सांगितल्यानंतर ५०६ शेतकऱ्यांनी आपल्या हिश्शाची रक्कम भरली, तर वाशिम जिल्ह्यात १ हजार ३०० उद्दिष्ट असताना ९५७ शेतकऱ्यांना मागणी पत्र सादर करण्यास सांगण्यात आले. त्यातील ४४६ शेतकऱ्यांनी पैसे भरले. आतापर्यंत या योजनेत अकोला जिल्ह्यात ३०५, बुलडाणा जिल्ह्यात ३७७, तर वाशिम जिल्ह्यात २४८ कृषी पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.