वाढत्या जलपर्णीचा आरोग्याला धोका
By admin | Published: April 6, 2017 12:57 AM2017-04-06T00:57:08+5:302017-04-06T00:57:08+5:30
पाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णीने फोफावलेले पाणी मेल्यासारखे दिसू लागते
कोरेगाव मूळ : पाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णीने फोफावलेले पाणी मेल्यासारखे दिसू लागते. मुळा-मुठा नदीपात्रामध्ये वाढलेल्या जलपर्णीमुुळे नदीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढीस लागल्या आहेत.
मुळा-मुठा नदीवरील कोरेगाव मूळ व बिवरी (ता. हवेली) गावांच्या दरम्यान असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर जलपर्णीची वाढ झालेली आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होऊन पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. नदीपात्रातील दूषित पाण्यावर तयार होणारे डास, मच्छर आदी उपद्रवी कीटकांमुळे नागरिकांना ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशा अनेक साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. सायंकाळी परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. जलपर्णीचा वाढता विळखा स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातून उत्पत्ती होणाऱ्या डासांचा व चिलटांचा उपद्रव नदीकाठच्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
पात्रांमध्ये होणारी अतिक्रमणे, भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी! जलपर्णीच्या संकटाने तर सर्वच नद्यांमध्ये घुसखोरी केली आहे. विशेषत: हिवाळा संपता संपता ती नद्यांचा ताबा घेते आणि मग पावसाळ्यापर्यंत तिचेच राज्य असते. खरेतर हे स्वाभाविक आहे.
दूषित पाणी, त्यात नायट्रेट-फॉस्फेटचा भरपूर अंश आणि वरून भरपूर सूर्यप्रकाश जलपर्णीला फोफावायला आणखी काय हवे? कितीही काढली तरी ती वाढतच राहते, कारण नदीच्या पात्रात तिचे खाद्य वाढून ठेवलेले असते.
तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी येथील बंधाऱ्यातून पाणी उपसा केला जातो. पाणी उपश्यासाठी असलेल्या विद्युत पंपांमध्ये नेहमी जलपर्णी अडकत असल्याने अनेकदा उपसा सिंचन योजना बंद ठेवावी लागते. त्यामुळे पुरंदर उपसा सिंचन योजनेचा लाभ कमी प्रमाणात होत आहे.
(वार्ताहर)
>सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी : खड्डे भरावे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतून मुळा-मुठा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडावे. जलसंपदा विभागाने तातडीने लक्ष देऊन नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी कोरेगाव मूळच्या सरपंच रोहिणी कानकाटे व उपसरपंच लोकेश कानकाटे यांनी केली.
तसेच, लघुपाटबंधारे विभागाने येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याला संरक्षण कठडे बसवावेत, बंधाऱ्यावरील उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी व बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीसाठी धोकादायक असलेले खड्डे भरून घ्यावेत, अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली.